विधानसभेत जे आजपर्यंत कोणी केलं नाही ते रोहित पवारांनी केलं, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जे आजपर्यंत कोणी केलं नाही ते रोहितनं केलं. विधानभवनात शपथ घेताना तो माझं नाव घेईल याची मला कल्पना नव्हती. त्याने माझं नाव घेणं माझ्यासाठी सुखद धक्का होता असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केलं. रोहित पवारांच्या शपथविधी नंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सुनंदा पवार म्हणाल्या, “जे आतापर्यंत कोणी केलं नव्हतं ते रोहितनं केलं. विधानभवनात शपथ घेताना तो माझं नाव घेईल याची मला कल्पना नव्हती. ज्यावळी त्याने मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार असा उल्लेख केला. तेव्हा मला सुखद धक्का बसला. प्रथमच कोणत्या आमदाराने शपथ घेताना आईच्या नावाचा उल्लेख केला. एका आईला जे समाधान वाटेल तेच समाधान मला आज वाटत आहे. रोहितनं आदर्श ठरावं असं काम करावं एवढीच माझी अपेक्षा आहे.”

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी आज विधानभवनात विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांचं वेगळेपण दिसून आलं. शपथ घेताना त्यांनी मी आमदार रोहित सुनंदा राजेंद्र पवार असा उल्लेख केला. यावेळी सभागृहातील सदस्यांनाही सुखद धक्का बसला. कारण इतर आमदारांनी शपथ घेताना आपलं संपूर्ण नाव घेतलं. तर रोहित पवार यांनी मात्र आवर्जून आईचं नाव घेतलं.

कर्जत-जामखेडमधून रोहित पवारांनी माजी मंत्री राम शिंदेंचा पराभव केला. यावर बोलताना सुनंदा पवार म्हणाल्या, “तब्येत बरी नसल्याने मी शपथविधी सोहळ्याला जाऊ शकले नाही. सध्या मी बारामतीतच आहे. कुटुंबातील इतर सदस्य शपथविधीला उपस्थित राहिले. मागील काही दिवसांपासून घरात तणावाची स्थिती होती. सर्व तणाव आता निवळला आहे. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते पवार साहेबांवर जेवढं प्रेम करतात तेवढंच प्रेम अजितदादांवरही करतात. आमचं कुटुंब अखंड आहे आणि राहणार.”

पुढे बोलताना सुनंदा पवार म्हणाल्या, “रोहितंन कर्जत-जामखेड मतदारसंघात आदर्शवत काम करावं. मतदारांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. त्या भागात रस्ते, पाणी आणि विजेची समस्या आहे. आमदार होण्याआधीच त्याने स्वत:ला कामात झोकून दिलं आहे. आताही त्याच्या प्रत्येक कामात कुटुंब म्हणून आम्ही सोबत राहणार आहोत.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Visit : Policenama.com 

You might also like