लक्ष्मी कॉलनीजवळील कालव्यात पत्र्याचे शेड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंढवा जॅकवेल ते खुटबावपर्यंत वाहणाऱ्या बेबी कालव्यालगत अनेक अतिक्रमणे झाली आहेत. मात्र, आता हडपसरमधील लक्ष्मी कॉलनी, गाडीतळ येथील पांढरेमळा, साईनाथ वसाहत, मोठ्या कालव्यावर महात्मा फुले वसाहतीलगतही कालवा बुजवून वाहन पार्किंग केले असून, कालव्यात पत्रा शेड उभारले आहे. त्यामुळे बेबी कालव्यातून पाण्याचा प्रवाह सुरू झाल्यानंतर पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन कालवा फुटण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली.

कालव्याच्या जागेवर अतिक्रमण हा विषय नवीन नाही. अतिक्रमणाबाबत वारंवार वृत्तपत्रातून आणि मीडियामधून आवाज उठविला जातो. मात्र, पाटबंधारे विभाग त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. पाटबंधारे विभागाकडे अतिक्रमणाविषयी स्थानिकांनी तक्रार केली, तर संबंधित अधिकारी अतिक्रमण करणाऱ्याला नाव सांगतात. त्याचा परिणाम स्थानिक नागरिकांमध्ये तूतू मैमै होते. त्यामुळे कोणी तक्रार करण्यासही पुढे येत नाही.

हडपसरमधील कामठेवस्ती दाणीबाई विहिरीजवळ मोठा कालवा पाझरत होता. त्यावेळी स्थानिक नगरसेवक योगेश ससाणे यांनी तातडीने पाटबंधारे विभागाला सांगून पाण्याचा प्रवाह बंद केला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर चार दिवसांत कालव्याची दुरुस्ती केल्यानंतर पाण्याचा प्रवाह सुरू केला. त्यातून पाटबंधारे विभागाने तातडीने लक्ष घालून अतिक्रमणांवर ठोस कारवाई करून कालवा अतिक्रमणमुक्त करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

खडकवासला ते इंदापूर-दौंडपर्यंत कालवा फुटीच्या वारंवार घटना घडत आहेत. तरीसुद्धा पाटबंधारे विभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही. हिंगणेमळा येथे गणेश विसर्जनाच्या वेळी भिंत पडली होती. मात्र, सुदैवाने दुर्घटना टळली होती. एम्प्रेस गार्डनच्या पाठीमागे कालवा फुटून ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले होते. मागिल दोन वर्षांपूर्वी दत्तवाडी येथे कालवा फुटल्यानंतर कालव्यालगतच्या नागरिकांचे संसार वाहून गेले. त्यावेळी अनेकांनी वेगवेगळे तर्क काढले. त्यामध्ये काहींनी उंदिर-घुशींनी कालवा पोखरल्याचा दावा केला होता.

महापालिका हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही कालव्यातील कचरा स्वच्छ केला जात नाही. तसेच कीटकनाशक औषध फवारणीही केली जात नाही. त्यामुळे डास-मच्छरांच्या प्रादुर्भावामुळे साथीचे आजार पसरण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली. कामचुकार अधिकाऱ्यांवर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, अधिकारी कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आणि काही अधिकारी स्वीचऑफ असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

आता तरी कालवा स्वच्छ करा

कोरोना विषाणूमुळे नागरिकांची गाळण उडाली आहे. त्यातच बेबी कालव्यातील पाण्याचा प्रवाह बंद झाल्यामुळे डास-मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे कालव्यालगत राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागाने तातडीने कालव्याची स्वच्छता करून औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.