हडपसरमध्ये कालव्याच्या भरावातून पाणी वाहू लागल्याने नागरिकांत ‘घबराट’

पुणे : प्रतिनिधी – खडकवासला धरणातून दौंड-इंदापूरसाठी पाणी सोडले आहे. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त पाणी कालव्यात सोडल्यामुळे हडपसरमधील डॉ. राम मनोहर लोहिया उद्यानाच्या पाठीमागील कालव्याच्या भरावातून पाणी वाहू लागले असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. गुरुवारी रात्री काही प्रमाणात पाणी भरावातून वाहत होते. मात्र, शुक्रवारी जास्त पाणी वाहू लागल्याचे नागरिकांनी सांगितले.

हडपसरमधून वाहणारा उजवा कालवा 1965 साली बांधला आहे. त्यानंतर त्याची दुरुस्ती केली गेली नाही. मागिल काही वर्षांपूर्वी हिंगणेमळा येथे गणेश विसर्जनाच्या दिवशी भिंत कोसळली होती. मात्र, नागरिकांच्या तत्परतेमुळे दुर्घटना टळली होती. एम्प्रेस गार्डनच्या पाठीमागेही कालवा फुटला होता. तसेच दौंड-इंदापूर दरम्यानही अनेक वेळा कालवा फुटीचे प्रकार घडले होते. मात्र, पाटबंधारे विभागाकडून गांभीर्याने का पाहिले जात नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

आज गुरुवारी (दि. 30 एप्रिल) रात्री भरावातून पाणी वाहत होते. त्यानंतर शुक्रवारी (दि. 1 मे) जास्त प्रमाणात पाणी भरावातून वाहू लागल्याने धोका वाढला. या ठिकाणी सुमारे 150 झोपड्या आहेत. कालवा हडपसर परिसरातून पुढे जात असल्याने नागरिकांमध्ये काहीसे घबराटीचे वातावरण पसरले होते.

दरम्यान, कालव्यातून क्षमतेपेक्षा जास्त पाणी असल्याने भरावातून पाणी वाहत असल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी नगरसेवक योगेश ससाणे यांना माहिती दिली. ससाणे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे पोपट शेलार, कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. कालव्यातील पाण्याचा विसर्ग बंद केला. शेलार आणि पाटील यांनी संबंधितांना माहिती दिली असून, तातडीने भरावाची दुरुस्ती केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

ससाणे म्हणाले की, कालव्याच्या भरावातून गुरुवारी पाणी वाहू लागल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्यानंतर घटनास्थळी धाव घेत अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. अधिकाऱ्यांनी तातडीने कालव्यातील पाण्याचा विसर्ग बंद केला. कालव्यातील पाण्याचा विसर्ग बंद होण्यासाठी 4-5 तास लागतील. त्यानंतर भरावाचे काम केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.