प्रवाशांना लुबाडणाऱ्या टोळीला बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – प्रवाशाला रिक्षात बसवून त्याला कोयत्याच्या धाकाने मारहाण करत लुटल्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास हडपसर येथील आकाशवाणी समोर घडला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी रिक्षाचालकासह ६जणांना अटक केली आहे.

गौरव शिवराम गायकवाड (वय १९, रा. टाळगाव, चिखली), जयदीप नवीन कुमार शहा (वय १९, रा. भुजबळ वस्ती, चाकण), शुभम तात्या काळे (वय १९, रा. गंगानगर, फुरसुंगी), अंकित शिवाजी राऊत (वय २६, रा. तुकाईदर्शन, फुरसुंगी), अमोल राजू शिंदे (वय २१, गंगानगर, फुरसुंगी), रोहित दीपक भोसले (वय २४, गंगानगर, फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी मोहसीन शेख (वय ४२, उरुळी देवाची) यांनी फिर्याद दिली आहे.

मोहसीन शेख हे त्यांच्या कामासाठी रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पुणे स्टेसनवरून उरुळी कांचन येथे जाण्यासाठी थांबले होते. त्यावेळी एका रिक्षाचालकाने त्यांना सोडण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवून घेतले. त्यानंतर रिक्षा हडपसर येथील आकाशवाणी येथे आल्यावर चालकाने रिक्षा थांबवली. त्याने शेख यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यांनी नकार देताच त्याने त्यांना दगडाने मारहाण केली.

त्यानंतर फोन करून पाच साथीदारांना बोलवून घेतले. त्या सहा जणांनी मोहसीन शेख यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख ७०० रुपये आणि मोबाईल काढून घेतला. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी काही तासांतच त्यांना बेड्या ठोकल्या. अटक केलेल्यांकडून पोलिसांनी १ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.