सैन्यदलातील मुला-मुलीचं कन्यादान केलं हडपसर पोलिसांनी

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर पुन्हा 17 मेपर्यंत लॉकडाऊन केले आहे. मात्र, आयटी इंजिनिअर आदित्य बिश्त आणि डॉ. नेहा कुशवाह यांचा विवाह हडपसरमधील अमानोरा क्लबमध्ये हडपसर पोलिसांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 2 मे) दुपारी 12.30 वाजता झाला. दोन्ही कुटुंबीयांना लॉकडाऊनमुळे लग्नसोहळ्याला उपस्थित राहता आले नाही. मात्र, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील आणि त्यांची पत्नी अश्विनी मनोज पाटील यांनी मुलीचं कन्यादान केलं.

मुलाचे वडिल सैन्यात कर्नल पदावर कार्यरत आहेत. त्यांचे पोस्टिंग डेहराडून येथे आहे, तर मुलीचे वडिलदेखील सैन्यदलात डॉक्टर असून, ते नागपूरमध्ये कार्यरत आहेत. मुला-मुलींच्या पालकांना लॉकडाऊनमुळे लग्नाला हजर राहता आले नाही. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांनी हडपसर पोलिसांनाच कन्यादान करण्याची विनंती केली. सैन्य अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन पुणे पोलिसांनी देखील लॉकडाऊनमधलं हे आगळं वेगळं लग्न सोहळा पार पाडला. हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, सहायक पोलीस निरीक्षक प्रासद लोणारे आणि पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी या लग्नाला हजर होते.

दरम्यान, मुलाचे वडिल कर्नल बिश्त यांनी हडपसर पोलीस स्टेशनमधील सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे यांना फोन करून मुलाचे लग्न लावून देण्यासाठी विनंती केली. मुलीचे वडिल सैनदलामध्ये डॉक्टर आहेत, तर मुलाचे वडिल डेहराडून येथे आहेत. दोन्ही कुटुंबीयांची माहिती घेतली असता, ते सैन्यदलामध्ये असल्याचे समजले. दोन्ही कुटुंबीय देश सेवेसाठी काम करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शुक्रवारी (दि. 1 मे) रात्री लग्नाची तयारी करून आज शनिवारी (दि. 2 मे) सोशल डिस्टन्सिंग ठेवून लग्न सोहळा पार पाडला, असे लोणारे यांनी सांगितले.