लक्ष्मी कॉलनीतील रस्त्यावर बसविले बॅरिगेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लक्ष्मी कॉलनी रस्त्यावर भाजी विक्रेत्या दलालांच्या गोडाऊनमुळे कोरोनाची भीती वाढली असे वृत्त प्रसिद्ध होताच हडपसर वाहतूक पोलिसांनी दखल घेत बॅरिगेट लावून वाहतुकीसाठी रस्ता बंद केला. दरम्यान, कालव्यावरील रस्त्याच्या कडेला पत्रावजा शेडमधील भाजीचे गोडाऊनही बंद केले, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसनामाचे आभार मानले.

हडपसर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजू ननावरे आणि नवनाथ काळे यांनी बॅरिगेट लावले आहेत.

कोळी म्हणाले की, कोरोना विषाणूच्या भीतीने नागरिकांची गाळण उडाली आहे. नागरिक स्वतः दक्षता घेत आहेत. सोलापूर रस्त्यावरून लक्ष्मी कॉलनीमार्गे कालव्यावरील रस्त्याने वाहनांची सतत मोठी वर्दळ वाढली. त्यातच भाजीविक्रेत्या दलालांनी गोडावून तयार करून तेथून किरकोळ व्यापाऱ्यांनी भाजीपाल्याची विक्री सुरू केली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये कोरोनाविषयी प्रचंड भीती पसरली होती. त्यामुळे या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी रस्त्यावर बॅरिगेट लावले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आभार मानले.

दरम्यान, सहायक पोलीस आयुक्त नागनाथ वाकुडे यांनी सांगितले की, देशभर लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहे. त्यातून भाजीपाल्यासह अत्यावश्यक सेवा वगळली आहे. त्याचाच फायदा घेत अनेकांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. कुठलेही नियम पाळले जात नाहीत, त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे, ही बाब लक्षात घेतली जात आहे. तसेच, नागरीवस्तीमध्ये वाहनांची वर्दळ होणार नाही, याची दक्षता घेऊन बॅरिगेट लावले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.