हडपसर : पोलीसनामा ऑनलाईन – Hadapsar Police News | पोलीस काका तुम्ही चोराला कसे पकडतात, आम्हाला सुद्धा तुमच्यासारखे पोलीस व्हायचे असेल तर काय करावे लागेल. कोणती परीक्षा द्यावी म्हणजे आम्ही पोलीस होऊ शकतो. अशा प्रश्नांबरोबरच आमच्या शाळेजवळ दामिनी पथक असते, पोलीस काका सुद्धा असतात त्यामुळे आम्हाला भीती वाटत नाही. अशा शब्दांमध्ये विद्यार्थ्यांनी पोलिसांशी संवाद साधला. निमित्त होते रायझिंग डे निमित्त हडपसर पोलीस स्टेशन येथे आयोजित केलेल्या विद्यार्थी व पोलीस संवाद याचे.
हडपसर पोलीस स्टेशन येथे रायझिंग डे निमित्त महात्मा फुले वसाहत व सातववाडी येथील विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनचे कामकाज समजून घेतले. “गुन्हेगारी व व्यसनाधीनता ” समाजासाठी घातक या विषयावर सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. याचे संयोजन शिवसमर्थ संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जगताप, दामिनी पथकाच्या अश्विनी खुळे, शिवसमर्थ संस्थेच्या अध्यक्षा मनीषा वाघमारे यावेळी उपस्थित होते.
यानिमित्त पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कायदे व संरक्षण याविषयी माहिती दिली. दामिनी पथकाने विद्यार्थिनींना गुड टच व बॅड टच याबद्दल माहिती दिली. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दामिनी मार्शल व पोलीस काका यांचे कामकाज याची माहिती देत त्यांचा परिचय करून दिला. पोलीस दलाचे कार्यालयीन कामकाज कसे चालते, याची माहिती संबंधित कार्यालयातील अंमलदार यांनी दिली. पोलिसांच्या वापरात असलेली शस्त्रे याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी व सामान्य नागरिक यांचा पोलिसांबद्दलचा आदर अधिकच वाढल्याचे जाणवले. पोलीस व नागरिक यांच्यामधील दरी कमी होऊन, त्यामधील सुसंवाद वाढावा. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत व राहू असा विश्वास सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांनी व्यक्त केला.
रायझिंग डे निमित्त ही संधी वर्षातून एकदाच मिळते. असे उपक्रम वर्षातून दोन वेळा आयोजित केले जावेत. असे आवाहन शिवसमर्थच्या अध्यक्षा मनीषा वाघमारे यांनी केले.
सर्वसामान्य व वसाहत भागात राहणाऱ्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी थेट पोलिसांनीच सुसंवाद साधला व भावी तरुणांचे समुपदेशन केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले.