मार्वल कायरा स्कीम फसवणुक प्रकरण : धनशेखरन, देसाई, प्रमोद मगर यांचा हडपसर पोलिसांकडून शोध सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिकेचा मंजुर नसलेला खोटा प्लॅन लावुन तो खरा असल्याचे दाखवुन खरेदीखताच्या दस्तमध्ये वापर करून ग्राहकांच्या संमतीशिवाय प्लॅनमध्ये बदल करून तब्बल पावणे चार कोटी रूपयांची फसवणुक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्हयात हव्या असलेल्या 3 बिल्डरांचा हडपसर पोलिस युध्दपातळीवर शोध घेत आहेत. दरम्यान, मार्वल बिल्डरचे विश्‍वजित सुभाष झंवर (49, रा. कोरेगाव पार्क) यांना शनिवारी पोलिसांनी अटक केली होती. झंवर हे सध्या पोलिसांच्या कोठडीत आहेत. या फसवणुक प्रकरणामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

मुकेश मोहनदास मनसुखानी (40, रा. दुबई) आणि त्यांचे भाऊ नवीन मोहनदास मनसुखानी (40, रा. दुबई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार

विश्‍वजित सुभाष झंवर (49, रा. फ्लॅट नंबर 1201, मार्कल औरम लेन नंबर 7, कोरेगाव पार्क), कार्तिक धनशेखरन (36, रा. विमाननगर), संजय जस्सुभाई देसाई आणि प्रमोद तुकाराम मगर यांच्याविरूध्द हडपसर पोलिस ठाण्यात भादंवि 420, 406, 409, 465, 467, 478, 471, 474, 120 (ब), 34, मोफा कायदा कलम 3,4,5,8 आणि 11 अन्वये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आहेत. मुकेश आणि नवीन मनसुखानी यांनी मार्वल कायरा स्कीमच्या मगरपट्टा येथील साईटमध्ये फ्लॅट आणि रेस्टॉरंट बुक केले होती. त्यावेळी मनसुखानी यांना झंवर आणि इतर आरोपींनी वेगळा प्लॅन दाखविला होता.

मनसुखानी हे दुबईमध्ये रहावयास आहेत.बुकिंग केल्यानंतर काही वर्षांनी ते पुण्यात आले. त्यांनी मार्वल बिल्डरच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांना बांधकामाच्या ठिकाणी दोनच साईट चालु असल्याच्या दिसल्या. त्याबाबत त्यांनी झंवर यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी झंवर आणि इतर बिल्डरांनी त्यांना उडवाउडवीची उत्‍तरे दिली. एकुण पावणे चार कोटी रूपयांची फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मनसुखानी यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. झंवर आणि इतरांविरूध्द हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल तांबे यांनी विश्‍वजित झंवर याला शनिवारी अटक केली. न्यायालयात झंवरला हजर करण्यात आले. पोलिसांनी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने झंवरला दि. 16 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

गुन्हयाचा तपास चालु असल्याचे हडपसर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल तांबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गुन्हयात हव्या असलेल्या इतर आरोपींचा शोध चालु असल्याचे सांगितले. दरम्यान, मार्वल बिल्डरच्या विरोधात कोणाची तक्रार असल्यास त्यांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. झंवर यांच्या अटकेचे वृत्‍त सर्वप्रथम ‘पोलीसनामा’ ऑनलाइनने शनिवारी प्रसिध्द केले. त्यानंतर तक्रारी देण्यासंदर्भात काही रहिवाशांनी ‘पोलीसनामा’शी संपर्क केला होता.