पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Hadapsar Pune Crime News | वेगवेगळ्या ब्रँडेड कंपन्याचे बनावट शर्टांची विक्री करणार्या दुकानावर हडपसर पोलिसांनी छापा टाकून तेथून तब्बल ४ लाख ८ हजार रुपयांचे ५१० बनावट शर्ट जप्त केले आहे.
याबाबत मंगेश जगन्नाथ देशमुख (वय ४५, रा. वारजे माळवाडी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रितम सुदाम गावडे (वय ३४, रा. साडेसतरानळी रोड, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश देशमुख हे युएसपीए ग्लोबल लायसेनिंग या कंपनीचे इन्वेस्टिगेशन अधिकारी आहेत. यु एस पोलो असो़ ट्रेडमार्क कंपनीच्या बनावट शर्टची हडपसर येथील महादेवनगरातील रॉयल मेन्स कलेक्शन येथे विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड व त्यांचे सहकारी हवालदार कांबळे, गोसावी व पोलीस अंमलदार राऊत, केसकर, महिला अंमलदार महामुनी, कामठे यांनी रॉयल मेन्स कलेक्शन या दुकानावर छापा घातला. त्यात ४ लाख ८ हजार रुपयांचे ५१० शर्ट बनावट असल्याचे दिसून आले. पोलिसांनी ते सर्व जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे पोलीस हवालदार कांबळे तपास करीत आहेत.