अज्ञात वाहनाच्या धडकेत 16 वर्षीय मुलाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेला त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मगरपट्ट्यातील कै. लक्ष्मीबाई मगर शाळेसमोरील रस्त्यावर घडली. मात्र, अज्ञात वाहन चालकाचा अद्याप पत्ता लागलेला नाही.

सोहम शिवाजी सुरवसे (वय १६, रा. मगर पेट्रोलपंपजवळ, हडपसर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. रितेश भीमराव इंगोले (वय १५, रा. कुंजीरवस्ती, मुंढवा ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी समाधान लटके (वय २७, रा. कापरे वस्ती, हडपसर ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहम आणि रीतेश मित्र असून काल सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवर मगरपट्ट्यातील लक्ष्मीबाई मगर शाळेसमोरील रस्त्यावरुन चालले होते. त्यावेळी सोहम दुचाकी चालवित होता. तर रितेश पाठीमागे बसला होता. अचानक समोरुन भरधाव वेगातील वाहन चालकाने सोहमच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दोघेही खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. धडकेत वाहनांचा मोठा आवाज आल्यामुळे परिसरातून जाणाऱ्या समाधानने मित्रांच्या अपघातग्रस्त दोघांनाही रिक्षातून खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सोहमचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रितेशच्या पायाचे हाड मोडले असून शरीरावर त्याला जखमा झाल्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आठवड्यातील दुसरी घटना…
शहरात रस्त्यावरील अपघातांमध्ये तरुणाईचे सर्वाधिक प्रमाण असल्याचे आकडेवारीवरुन दिसून आले आहे. आठवड्यात वेगवेगळ्या अपघातात दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. चार दिवसांपुर्वी बंडगार्डन रस्त्यावर क्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीला जीव गमवावा लागला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/