Pune : जेष्ठ नागरिकांच्या मनातील ‘कोरोना’ची भीती दूर करण्यासाठी हडपसरमध्ये राबवला अनोखा प्रयोग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याने अनेकांच्या मनात कोरोनासंदर्भात भीती निर्माण झाली आहे. पुण्यातील हडपसरमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हांडेवाडी रोड येथील विरंगुळा केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना समुपदेशन करण्यात येत आहे. शिवाय त्यांचे शांततेत लसीकरण करण्यात येत आहे. जेष्ठ नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी महापालिकेचे डॉक्टर व शिवसैनिकांचे पथक काम करत आहे.

हांडेवाडी रोड येथील श्रीराम चौकातील अशोकनगर सोसायटीच्या शेजारी महापालिकेचे अण्णाभाऊ साठे विरंगुळा केंद्र आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना नियोजनबद्ध लसीकरण करण्यात येत आहे. शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी परिसरातील नागरिकांना सकाळी नंबर प्रमाणे टोकन देऊन त्या त्या वेळेत बोलावून त्यांचे लसीकरण केले जात आहे. या केंद्रावर उपस्थित असणारे डॉ. पूनम सिंग व स्वयंसेवक प्रकाश कालगुडे हे नागरिकांच्या मनातील कोरोना विषयीची भीती आणि गैरसमज दूर करत आहेत. शिवाय त्यांना माहिती समजावून सांगत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये असलेली कोरोनाची भीती दूर होत असून नागरिक सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. तसेच यावेळी नागरिक सोशल डिस्टनसिंग ठेऊन रांगेत खुर्चीवर बसून नंबर प्रमाणे लस टोचून घेत आहेत.

केंद्रप्रमुख डॉ. पूनम सिंग यांनी सांगितले की, लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिक आनंदाने लस घेत आहेत. रोज 80 ते 90 नागरिकांना लस देण्यात येत आहे. विशेष म्हणजे येथील जेष्ठ नागरिक इतरांना लस घेण्याविषयी सांगत आहेत. या केंद्रावर 45 वर्षापुढील वयोगटातील नागरिकांना सोशल डिस्टन्स ठेऊन लस दिली जात आहे. नागरिकांच्या मनात असलेली भीती दूर करण्याचे प्रयत्न नगरसेवक प्रमोद भानगिरे आणि त्यांचे कार्यकर्ते करत आहे. त्यामुळे लोक शांत डोक्याने सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.