१८ लाखांच्या इन्शुरन्ससाठी गाडी चोरीला गेल्याचा बनाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – टोयोटा इनोव्हा क्रिस्टा गाडी चोरीला गेल्याचा बनाव करून इन्शुरन्सचे १८ लाख रुपये हडपण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला आहे. फायनान्सचे हप्ते भरण्यास असमर्थ असल्याने कंपनीकडून इन्शुरन्सचे पैसेही घ्यायचे आणि मध्यप्रदेशात गाडी विकून त्याचे सुद्धा पैसे घ्यायचा गाडी मालकाचा बनाव उघडकिस आणत पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

किरण दत्तात्रय जाधव (२४, हडपसर, मुळ, खामकरा वाडी उस्मानाबाद) असे अटक कऱण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण जाधवने टोयोटा इनोव्हा क्रिस्टा गाडी टुरिस्ट व्यवसायाकरता घेतली होती. परंतु तो फायनान्सचे हप्ते भरू शकत नव्हता. त्यामुळे त्याने गाडी चोरीला गेल्याचा बनाव रचला. त्यानंतर इफको टोकीयो कंपनीकडून गाडीच्या इन्शुरन्स कंपनीकडून पैसे घ्यायचे व गाडी मध्यप्रदेशात विकून त्याचेही पैसे घ्यायचे असा प्लान त्याने रचला. त्यानतंर त्याने ठरलेल्या बनावाप्रमाणे २५ सप्टेबर २०१८ रोजी त्याने गाडी चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

त्यादरम्यान त्याने गाडी अहमदनगर जिल्ह्यात लपवून ठेवली. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथेही लपवून ठेवली. त्याच काळात मध्यप्रदेशातील एका व्यक्तीला विकण्याचेही ठरवले. त्यानंतर इंशुरन्स कंपनीला आवश्यक असणारा पोलिसांचा अंतिम अहवाल न मिळाल्याने व्यवहार होत नव्हता.

त्याच वेळी हडपसर पोलीस आपल्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे व पोलीस नाईक विनोद शिवले यांना माहिती मिळाली की, काही दिवसांपुर्वी हडपसरमधून चोरीला गेलेली इनोव्हा नंबर प्लेट बदलून मांजरी परिसरात फिरत आहे. त्यानुसार पोलिसांनी मांजरी फाटा येथे दिसली.  त्यावेळी चालकाकडे चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलीसी हिसका दाखविल्यावर मात्र त्याने आपणच इन्शुरन्सच्या पैशांच्या हव्यासापोटी बनाव रचल्याचे सांगितले.

इन्शुरन्सचे पैसे मिळविण्याच्या हव्यासापोटी गाडी चोरीला गेल्याची खोटी तक्रार देऊन दिशाभूल केल्याप्रकऱणी त्याच्याकडून ही गाडी जप्त केली आहे. तसेच त्याच्याविरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्याची तजवीज केली आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस कर्मचारी नितीन मुंढे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, अकबर शेख, शशिकांत नाळे, प्रमोद टिळेकर यांच्या पथकाने केली.