पुण्यात रविवारपासून सुरू होणार हेअर सलुन अन् ब्युटी पार्लर, मनपाकडून नियमावली जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून अनेक व्यवसाय अद्यापही बंद आहेत. लॉकडाऊन नंतर अनलॉकमध्ये काही व्यवसाय सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, केशकर्तनालय दुकाने, सलुन, स्पा, ब्युटी पार्लर यांना परवानगी देण्यात आलेली नव्हती. मात्र, आता राज्य शासनाने केशकर्तनालय दुकाने, सलुन, स्पा, ब्युटी पार्लर सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सलुन आणि ब्युटी पार्लर सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र काही अटींवर हे सलुन आणि ब्युटी पार्लस सुरु करता येणार आहेत. तसे आदेश त्यांनी शुक्रवारी (दि.26) जारी केले आहेत. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रामधील सलुन आणि ब्युटी पार्लर बंदच राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने राज्य सरकारने 25 जूनच्या आदेशानुसार केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलुन, ब्युटी पार्लर चालू ठेवण्यासाठी अटी व शर्तींच्या आधीन परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने पुणे जिल्ह्यात ग्रामीण क्षेत्रात, नगरपंचायत, नगर पालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत, तसेच छावणी परिषद हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रामध्ये केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलुन, ब्यूटी पार्लर सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

‘या’ अटी शर्तींचे पालन करावे लागणार आहे
1. सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी
2. केस कापणे, केसाला रंग देणे, वॅक्सिंग, थ्रेडिंगला परवानगी परंतु त्वचेशी संबंधित सेवांना परवानगी नाही
3. कर्मचाऱ्यांनी हातमोजे, अ‍ॅप्रॉन, मास्क, सॅनिटायझर अशा संरक्षक साधनांचा वापर करणे आवश्यक.
4. प्रत्येक सेवेनंतर खुर्ची स्वच्छ, निर्जंतूक करणे आवश्यक
5. दुकानातील संपूर्ण जागा, फरशी प्रत्येक 2 तासांनी स्वच्छ, निर्जंतूक करावी
6. वापर झाल्यानंतर विल्हेवाट लावता येईल, अशा टॉवेल्स, नॅपकिन्सचा वापर करावा
7. प्रत्येक सेवेनंतर उपकरणे स्वच्छ, निर्जंतुकीकरण करावीत
8. सेवा देणारा व सेवा घेणारा सोडून इतर व्यक्तींमध्ये तीन फुटांचे अंतर बंधनकारक
9. मास्क, रुमाल नाका-तोंडाला झाकून ठेवणे आवश्यक
10. दुकानामध्ये सॅनिटायझर, हॅन्डवॉश, साबण व इतर हात धुण्याचे साहित्य ठेवणे बंधनकारक
11. ग्राहकांना केवळ अपॉईंटमेंट घेऊनच येण्यास कळवावे
12. ग्राहक विनाकारण दुकानामध्ये वाट पाहत राहणार नाही, याची सलून मालकांनी दक्षता घ्यावी.
13. प्रत्येक दुकानदारांनी ग्राहकांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबतची माहिती दुकानाच्या दर्शनी भागात ठळक स्वरुपात लावावी.
14. अटींचे उल्लंघन केल्यास दंडात्मक, कायदेशीर कार्यवाही करून परवानगी रद्द
15. आदेशांचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा समूह शिक्षेस पात्र राहील.