केशकर्तनाचे दर वाढले ! कटींगसाठी 150 तर दाढीसाठी मोजावे लागणार 100 रुपये

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या 6 महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या सलून आणि ब्युटी पार्लरला आता सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन करत ते सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नवी मुंबईतील 80 टक्के केशकर्तनायल व्यवसायिकांनी दुकानं सुरू केली आहे. परंतु आता ग्राहकांना पूर्वीपेक्षा 30 ते 35 टक्के अधिक पैसै मोजावे लागत आहे. यानुसार आता वातानुकूलित केशकर्तनालयात केसासाठी 150 तर दाढीसाठी 100 रुपये मोजावे लागणार आहेत.

नवी मुंबई शहरात लहान-मोठी 700 ते 800 व्यवसायिकांची दुकानं आहेत. त्यात 70 टक्के ही सर्वसामान्यांना परवडतील अशी आहेत तर 30 टक्के ही वातानुकूलित आहेत. दुकानातील खुर्च्यांची संख्या कमी करून खुर्च्यांमध्ये अंतर ठेवणं, मास्क सॅनिटायजरचा वापर करणं, ग्राहक आणि सलून कारागीर यांना युज अँड थ्रो पीपीई किट वापरणं तसंच हँडग्लोज, डोक्याला पीपीई टोपी अशा प्रकारचा खर्च वाढल्यानं तो आम्हाला न परवडणारा आहे. त्यामुळं सलूनमध्ये दरवाढ केल्याशिवाय पर्याय नाही असं सलून व्यवसायिकांचं म्हणणं आहे.

नरेश गायकर (नाभिक विकास फाऊंडेशन, नवी मुंबई अध्यक्ष) यांनी सांगितलं की, लॉकडाऊन काळात केशकर्तनालयात काम करणारे कारागीर त्यांच्या मूळगावी गेल्यामुळं पूर्वीसारखी कमाई होत नाही. त्यातच कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून आम्हाला एका ग्राहकासाठी 30 ते 35 रुपये जास्त खर्च येतो. त्यामुळं दरवाढ करावी लागत आहे.

हिदास गायकर (हु. विरभाई कोतवाल, नाभिक संस्था, घणसोली अध्यक्ष) यांनी सांगितलं की, गेल्या 6 महिन्यात केशकर्तनालय व्यवसाय बंद असल्यानं दुकान मालकाला काही बँकांकडून कर्ज काढून भाडं देण्याची वेळ आमच्यावर आली. कारागिरांचा पगार परवडत नसल्यानं स्वत: काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहोत.