VHP च्या माजी जिल्हाध्यक्षाची कापली शेंडी; सलून व्यावसायिकाला अटक

देहराडून : वृत्तसंस्था – केस कापत असताना शेंडी कापल्याप्रकरणी सलून व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे घडली. विश्व हिंदू परिषदेच्या एका नेत्याची शेंडी कापल्याने सलून व्यावसायिकाला अटक केली आहे. धार्मिक भावना दुखावण्यासाठी त्याने जाणूनबुजून संबंधित नेत्याची शेंडी कापल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विश्व हिंदू परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष विशंभर दत्त पलडिया हल्द्वानी येथील लामाचौड परिसरात राहतात. पलडिया हे सोमवारी आपल्या शेजारी असलेल्या सलून दुकानात केस कापण्यासाठी गेले होते. केस कापता कापता त्या व्यावसायिकाने शेंडीही कापली. त्यामुळे गोंधळास सुरुवात झाली. दरम्यान, काही वेळापूर्वी पलडिया यांचे भाऊसुद्धा तिथून केस कापून गेले होते. त्यांचीही शेंडी कापलेली आढळली. त्यामुळे या व्यावसायिकाने जाणूनबुजून आपली शेंडी कापली, असा आरोप पलडिया बंधूंनी केला आहे.

या घटनेनंतर परिसरात तणाव वाढला होता. त्यामुळे पोलिसांनी या सलून व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच कलम २९५ अ नुसार धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्याला अटकही केली आहे.