रद्द होऊ शकते हज यात्रा -2020 ! आतापर्यंत झाली नाही प्रस्थानाची घोषणा, महाराष्ट्र हज समितीनं केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाला लिहिलं पत्र

नागपुर : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. याचा परिणाम दरवर्षी जागतिक स्तरावर होणार्‍या हज यात्रेवरही होताना दिसत आहे. यावर्षी हज यात्रा रद्द होण्याची शक्यता आहे. जूनमध्ये भारतातून हज यात्रेला प्रारंभ होतो. यासाठी मार्च महीन्यात हज यात्रेचे प्रस्थान वेळपत्रक घोषित केले जाते. परंतु, हज कमेटी ऑफ इंडियाने आतापर्यंत याची घोषणा केलेली नाही.

कोरोनामुळे यावर्षी होणारी हज यात्रेची सर्व प्रक्रिया अजूनही बंद ठेवण्यात आली आहे. तर हज यात्रा रद्द होण्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्र राज्य हज समितीने केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. समितीने केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांना पत्रात हज 2020 वर तात्काळ निर्णय घेऊन लोकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याची विनंती केली आहे.

राज्यातून 28 हजार अर्ज, 12,500 निवडले

या वर्षी महाराष्ट्रातून 28 हजार लोकांनी हज यात्रेसाठी अर्ज केले होते. यापैकी 12 हजार 500 लोकांची निवडसुद्धा करण्यात आली. यामध्ये नागपुरसह संपूर्ण विदर्भातील व्यक्तींचा समावेश आहे. राज्य हज समितीने संपूर्ण महाराष्ट्रात प्रशिक्षण कार्यक्रमसुद्धा चालवले. यासाठी 120 प्रशिक्षक सुद्धा तयार केले होते. खादिमुल हुज्जाज सुद्धा नियुक्त केले होते. परंतु, कोरोनामुळे हे सर्व प्रक्रिया बंद राहिली.

निवड झालेल्यांची जमा रक्कम भरपाईसह परत करा

राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे हज यात्रा शक्य नाही. 30 जुलैरोजी हजचा दिवस ठरलेला आहे. यामुळेच जूनमध्ये प्रस्थान होते. परंतु, अजूनपर्यंत प्रस्थानाची घोषणा झालेली नाही. यातून स्पष्ट होते की, यावेळी हजयात्रा शक्य नाही.

ते म्हणाले, निवड झालेल्यांनी फेब्रुवारी महिन्यात हज कमेटीत 2 लाख 1 हजार रूपयांचा भरणा केला आहे. त्यांची रक्कम अजूनही जमा आहे. जमाल यांनी मागणी केली आहे की, निवड झालेल्यांचे पैसे परत करण्यात यावेत, सोबतच सरकारने त्यांना भरपाई सुद्धा द्यावी. सौदी सरकारने हज प्रक्रिया रोखून ठेवली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे ही प्रक्रिया थांबवली आहे.

तर, हज कमेटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मकसूद अहमद खान यांनी म्हटले की, सौदीहून कोणतेही स्पष्टीकरण न आल्याने अजूनपर्यंत भारताकडून हजयात्रेच्या प्रस्थानाबाबत घोषणा करण्यात आलेली नाही. केंद्रीय हज समिती आणि सरकारला सध्या सौदी सरकारच्या उत्तराची प्रतिक्षा आहे. हजयात्रेची सध्यातरी शक्यता दिसत नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like