‘हज’ यात्रेला पहिल्यांदाच जाणार महाराष्ट्र पोलिस दलातील 132 जण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – हज यात्रेच्या दरम्यान भारतीय हजींच्या मदतीसाठी निमशासकीय, शासकिय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची खादीमुल हुज्जाज म्हणून नियुक्ती करण्यात येते. यावेळी पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलीस दलातील पोलिसांना संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातून 132 पोलीस कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी हज यात्रेला जाणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. खादीमुल हुज्जाज म्हणून वर्ग 1 व त्यावरील अधिकारी यांना वगळून संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती शासनाकडून करण्यात येते आत्ता पर्यंत या पदासाठी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांची निवड करण्यात येत होती. मात्र, यंदा पहिल्यांदाच शासनाने या सेवेचा लाभ पोलिसांना दिला आहे. पोलीस दलात कार्य़रत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना या सेवेचा लाभ मिळावा यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. पोलीस दलातील सर्व विभाग तसेच गृह विभागात येणाऱ्या सर्व विभागातील मुस्लिम कर्मचाऱ्यांना खादीमुल हुज्जाज म्हणून ऑनलाइन अर्ज करता हज कमिटीच्या संकेत स्थाळावर करता येणार आहेत.

खादीलमुल हुज्जाज या पदावर काम करण्यासाठी जाण्यापूर्वी संबंधित विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. राज्यातील पोलिसांना पहिल्यांदाच देण्यात आलेल्या या संधीची माहीती विभागाने आपल्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना द्यावी, असे आदेश राज्य पोलीस महासंचालकांनी काढले आहेत.