‘हल्दीराम भुजियावालाचे मालक अग्रवाल यांचे निधन, ‘लॉकडाउन’मुळे परदेशातच अडकले कुटुंबीय

पोलिसनामा ऑनलाईन टीम – सर्वसामान्य कुटूंबात जन्म घेउन शेवेचे छोटेसे दुकान ते हल्दीराम भुजियावाला (प्रतीक फूड प्रॉडक्ट्स) असा यशस्वी प्रवास करणारे हल्दीराम भुजियावालाचे मालक महेश अग्रवाल यांचे शुक्रवारी मध्यरात्री सिंगापूरमध्ये निधन झाले. यकृताच्या गंभीर आजारामुळे मागील तीन महिने त्यांच्यावर सिंगापूरमधील रूग्णायलात उपचार सुरू होते.

कोरोनामुळे देशात लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे त्यांचे कुटुंबीय हे सिंगापूरमध्येच अडकले आहे. त्यामुळे अग्रवाल यांच्या पार्थिवावर सिंगापूरमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. अग्रवाल यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन मुली असा त्यांचा परिवार आहे. अग्रवाल यांना यकृताचा गंभीर आजार होता. जानेवारीत सिंगापूरच्या रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती, परंतु त्यानंतर संसर्ग उद्भवल्याने त्यांचा आजार बळावला. त्यामुळे त्यांना आयसीयूमधून अतिउच्च दक्षता विभागात हलवण्यात आले होते.

उपचाराला पृतिसाद न दिल्यामुळे अखेर त्यांचे शुक्रवारी निधन झाले.
सिंगापूरमध्ये त्यांना हिंदू रितीनुसार अंत्यसंस्कार करण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे सिंगापूरच्या नियमांनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महेश अग्रवाल यांचे निधन झाले, तेव्हा त्यांची पत्नी मीना आणि मुलगी अवनी त्यांच्यासोबत सिंगापूरमध्ये होते. आता त्यांची भारतात येण्याची इच्छा आहे. पण सध्या देशभरात लॉकडाउन असल्याने हे शक्य नाही. या दोघींनीही भारतीय दूतावासात भारतात आपल्या घरी परत जाण्यासाठी अर्ज केला होता, मात्र मंगळवारपासून सिंगापूर येथेही लॉकडाऊन सुरु होणार आहे. त्यामुळे या दोघींचे भारतात येणे कठीण आहे. दरम्यान, बुधवारी पहाटे त्यांना दिल्लीत परत घेऊन येण्यासाठी एका विमानाचे आयोजन करण्यात येण्याची शक्यता आहे.