पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे एमआयडीसीला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असताना या ठिकाणी भूसंपादन करण्यात येत आहे. मागील दहा वर्षापासून निवेदने देऊन देखील या ठिकाणच्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे ३५० प्रकल्पवाधित व खातेदार शेतकऱ्यांनी आज (सोमवार) पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढला. मात्र आयुक्तांनी ठोस आश्वासन न दिल्याने शेतकऱ्यांनी मंत्रालयाकडे आपला मोर्चा वळवला आहे.

खंडाळा एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक १,२,३ आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ साठी केसुर्डी, धनगरवाडी, शिवाजीनगर खंडाळा, बावडा, मावशी, मोर्वे, भादे, अहिरे या गावातील शेतक-यांच्या तब्बल दोन हजार हेक्टर जमिनीचे संपादन केले जात आहे. मात्र,केवळ ६० हेक्टर जमिनीचे संपादन करण्यास काही शेतकऱ्यांनी संमती दर्शविली आहे. उर्वरित सर्व शेतकऱ्यांचा या भूसंपादनाच्या प्रक्रियेस विरोध असून त्यांनी याबाबत आक्षेप नोंदविला आहे. मागील दहा वर्षापासून त्यांनी अनेक स्थरावर निवदेनं दिली मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. संतप्त प्रकल्पग्रस्त व खातेदार शेतकऱ्यांनी १२ जानेवारी रोजी पायी अर्धनग्न मोर्चाला सुरूवात केली. आज सकाळी कात्रज येथून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. सुमारे तीन तास विभागीय आयुक्तांशी शेतकरी संघटनेची झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी आपला मोर्चा मुंबईच्या दिशेने वळवला आहे.

भूसंपादनास विरोध करण्यासाठी शेतकरी संघटना किसान मंचतर्फे खंडाळा ते मत्रालयापर्यंत मोर्चा काढला जात आहे. विभागीय आयुक्तांनी शेतकऱ्यांच्या मागण्याची पूर्तता करण्यासाठी अवधी मागितला. तसेच कोणेतेही लेखी आश्वासन दिले नाही. त्यामुळे दररोज ३० ते ४० किलोमिटर दररोज पायी प्रवास करून पुढील आठ दिवसात मोर्चा मंत्रालयावर जावून धडकणार आहे,असे शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष प्रमोद जाधव यांनी स्पष्ट केले.