‘ते फलक तातडीने हटवा, अन्यथा आम्ही काढू’, तृप्ती देसाई यांचा साई संस्थानाला इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिर्डीमधील साई संस्थानमध्ये भक्तांनी तोकडे कपडे न घालता भारतीय पेहरावात यावे असे आवाहन करणारे फलक लागल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. साई संस्थानने मंदिराच्या आवारातून हे फलक हटवावेत, अन्यथा ते आम्हाला काढावे लागतील, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे. मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात ते चालते. मग भक्तांच्या कपड्यांवर निर्बंध कशाला, असा प्रश्न तृप्ती देसाई यांनी विचारला आहे.

देसाई म्हणाल्या की, अशा आशयाचे फलक लावणे हा भारतीय घटनेचा अवमान आहे. शिर्डीमध्ये देश-विदेशातून भक्त येत असतात. ते वेगवेगळ्या जातीधर्माचे असतात. शिर्डी संस्थानने भक्तांनी सभ्य पोशाख परिधान करून येण्याचे आवाहन केले आहे. तसा फलक लावला आहे. भारतात घटना आहे आणि घटनेने अभिव्यक्ती आणि व्यक्तीस्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे हा घटनेचा अवमान आहे. मंदिरात कशाप्रकारचे कपडे घालायचे याचे भान भाविकांना असते, असे त्या म्हणाल्या. अनेक मंदिरात आणि शिर्डीतही पुजारी अर्धनग्नावस्थेत असतात. मात्र अर्धनग्न पुजाऱ्यांसाठी मंदिरात प्रवेश नाही, असे कधी कुठल्या भक्ताने फलक लावले नाहीत, असेही तृप्ती देसाई म्हणाल्या.