Coronavirus : देशातील एकूण मृत्यूपैकी निम्मे 3059 मृत्यू मागील 15 दिवसांत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणूने मार्च महिन्याच्या मध्यात देशात शिरकाव केला. मार्च महिन्यात देशात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाल्यापासून ते आजपर्यंत सात आठवड्यांच्या कालावधीत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 6 हजार 929 वर गेली आहे. यातील जवळपास निम्मे म्हणजेच 3 हजार 59 मृत्यू हे मागील पंधरावड्यात झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या 26 जिल्ह्यांमध्ये यातील 80 टक्के मृत्यू आहेत. मागील दोन आठवड्यात मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, ठाणे, पुणे आणि चेन्नई या जिल्ह्यांमध्ये 100 पक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. याच कालावधीमध्ये मृत्यू झालेल्या एकूण 4 हजार 55 मृत्यूंपैकी, या ठिकाणी 1 हजार 964 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाले आहेत.

भारतात मृत्यूचा दर अद्याप कमी म्हणजेच 2.8 टक्के एवढा आहे. तर जागतिक मृत्यू दर 5.8 टक्के आहे. अमेरिकेचा 5.7 टक्के, ब्राझिल 5.5 टक्के तर रशियाचा मृत्यू दर हा 1.2 टक्के आहे. कोरोनाच्या रुग्णांची आणि मृत्यूची संख्या कायम असून, यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मागील पंधरा दिवसात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या जिल्ह्यांमध्ये किमान एक किंवा त्यापेक्षा अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.

उत्तर प्रदेशातील 18 आणि बिहारमधील 13 असे नवीन जिल्हे आहेत त्याठिकाणी पहिल्यांदाच कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे या जिल्ह्यामध्ये कोरोना मोठ्या प्रमाणावर फैलावला असल्याचे दिसून येत आहे. तर देशात 736 जिल्ह्यांपैकी जवळपास 700 जिल्हे असे आहेत की, ज्या ठिकाणी कोरोनाचा एकतरी रुग्ण आहे. 22 मे पर्यंत ही संख्या 630 होती. त्यानंतर नॉन कंटेनमेंट झोनमध्ये शिथिलता देत लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात प्रवेश केला.

दरम्यान, मागील 24 तासात देशात अतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 9 हजार 971 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर 287 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 46 हजार 628 वर पोहचली आहे. भारतामध्ये कोरोनामुळे आतापर्य़ंत 6 हजार 929 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.