धक्कादायक ! ब्रिटनमधील ‘कोरोना’ रुग्णांच्या वाढत्या संख्येला पाकिस्तान जबाबदार

ब्रिटन : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहेत. जगभरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 99 लाख 19 हजार 509 इतकी झाली आहे. त्यापैकी 53 लाख 72 हजार 240 रुग्ण बरे झाले असून 4 लाख 97 हजार 255 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोना रुग्णांचा आकडा आणखी वाढणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर करताना आगामी आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे.

ब्रिटनमधील कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 9 हजार 360 इतकी झाली आहे आणि त्यापैकी 43 हजार 414 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ब्रिटनमधल्या कोरोना रुग्णांच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. परदेशातून आलेल्या एकूण प्रवाशांपैकी निम्मे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे पाकिस्तानातून आल्याचा दावा ब्रिटनच्या आरोग्य विभागाने केला आहे. ब्रिटनमधील द एका वृत्तसंस्थेने हे वृत्त प्रकाशित केले आहे.

कोरोनाचा उच्च धोका असलेल्या देशांतून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन चेकअप करणं आव्हानात्मक आहे. 1 मार्चपासून पाकिस्तानातून 190 विमानांतून जवळपास 65 हजार लोक ब्रिटनमध्ये आले. एका दिवसात 4 हजार रुग्ण आढळले होते. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर ब्रिटनमध्ये प्रवास केलेल्या प्रवाशांची माहिती इंग्लंडच्या आरोग्य विभागाने दिली. 4 जून पासून पाकिस्तानातून ब्रिटनमध्ये आलेल्या प्रवाशांमध्ये 30 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

पाकिस्तानमधून दररोज दोन विमानं ब्रिटनमध्ये येत आहेत आणि त्यापैकी काही प्रवासी स्वत:हून हॉस्पिटलमध्ये जातात. पाकिस्तानातून हाँगकाँगला निघालेल्या विमानातील 30 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते आणि त्यानंतर इमिरेट्सनं विमान सेवा स्थगित केली. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय विमानं एप्रिलच्या सुरुवातीपासून थेट ब्रिटनमध्ये जात आहेत. प्रवाशांचे हिट सेन्सरने स्क्रिनींग होत असल्याची माहिती प्रवक्त्यांनी दिली आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या घरात पोहचली असून 4 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.