उद्यापासून 12 वी बाेर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र होणार उपलब्ध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक परिपत्रक काढले असून, १२ वी बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall tickets) ऑनलाईनद्वारे दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या लॉगीनमध्ये उद्यापासून (दि.३ एप्रिल) प्रवेशपत्र उपलब्ध केले जाणार आहे.

राज्यात इयत्ता १२ वी बोर्डाची परीक्षा २३ एप्रिलपासून वेळापत्रकानुसार ऑफलाइन घेतली जाणार आहे. तर याचे प्रवेशपत्र उद्यापासून मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर (संकेतस्थळ) कॉलेजमध्ये ऑनलाइन उपलब्ध असणार आहे. तर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना प्रिंट स्वरूपात देण्याची सूचना बोर्डाने महाविद्यालयांना दिली आहे.

तसेच, विद्यार्थ्यांना प्रिंट काढून दिल्यानंतर हॉल तिकिटावर उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची स्वाक्षरी आणि शिक्का त्या प्रवेशपत्रावर असणे आवश्यक आहे. प्रवेशपत्रामध्ये काही चुकी किंवा अडचण असल्यास तर महाविद्यालयाने मंडळामार्फत प्रवेशपत्रावर दुरुस्ती करून घ्यायची आहे. असे मंडळाने म्हटले आहे. दरम्यान, परीक्षेआधी किंवा परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना दिलेले प्रवेशपत्र हरवल्यास महाविद्यालयांनी विद्यार्थ्याला प्रवेशपत्राची दुसरी प्रिंट उपलब्ध करून देऊन, त्यावर डुप्लिकेट हा शेरा द्यावा, अशा सूचना बोर्डाने दिल्या आहे.