‘तुम्ही चांगलं काम करताय, फक्त ‘ही’ एक गोष्ट करा’, इंदुरीकर महाराजांना हमीद दाभोळकरांनी दिला ‘सल्ला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गर्भलिंग निदानावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली. एकीकडे इंदुरीकर महाराजांच्या या वक्तव्याचा विरोध होत असताना काही जणांनी त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर मोहीमदेखील सुरु केली होती.

इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. याबाबत नरेंद्र दाभोळकर यांचे चिरंजीव हमीद दाभोळकर म्हणाले की, “इंदुरीकर महाराजांनी जे विधान केले हे अशास्त्रीय स्वरुपाचं विधान आहे. मुलाचं आणि मुलीचं लिंग असं ठरत नाही हे विज्ञानाने स्पष्ट केलं आहे. महिलांबद्दल त्यांचं बोलणं अनेकदा आक्षेपार्ह असत. परंतु त्यांच्या कीर्तनामध्ये समाज प्रबोधनाच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी ते मांडतात. आणि आपल्यामध्ये एखादी चूक असेल ती दुरुस्ती करुन घेणे यात कोणताच कमीपणा नाही. त्यांनी ही चूक दुरुस्त करुन घ्यावी, यापुढे येणाऱ्या काळात एवढा मोठा समुदाय त्यांचे किर्तन ऐकतो, त्यांना विज्ञान नीट समजून सांगावं, स्त्री-पुरुष समतेचं मुल्य समजून सांगावं. त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातून अनेक लोकांना गैरसमजातून बाहेर काढण्याची त्यांना संधी मिळाली आहे. ही संधी त्यांनी घ्यावी.” असं आवाहन हमीद दाभोळकरांनी इंदुरीकर महाराजांना केलं आहे.

मुला-मुलींच्या जन्माबाबत केलेल्या विधानावरून इंदुरीकर महाराज वादाच्या कचाट्यात सापडले असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या सर्व प्रकारानंतर इंदुरीकर महाराज उद्विग्न झाले. दोन तासांच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे काही बोललो, ते चुकीचं नाहीच. मी बोललेलं अनेक ग्रंथात नमूद आहे, असा खुलासाही इंदुरीकर महाराजांनी केला.

तसेच महाराज पुढे म्हणाले कि, “वादामुळे मला खूप त्रास होत आहे. मी कशात सापडेना म्हणून मला नको त्या प्रकरणात गुंतवण्याचा आटापिटा सुरू आहे. मी आता एका वेगळ्या निर्णयापर्यंत आलेलो आहे. आता लय झालं, आपली सहन करायची कॅपॅसिटी संपलेली आहे. एक दोन दिवस बघेन, फेटा ठेवून देईन आणि कीर्तन सोडून शेती करेन.” अशा भावनाही त्यांनी दोन दिवसांपूर्वी बोलून दाखविल्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like