बनावट नोटा बाळगणाऱ्या महिलेची शिक्षा कायम

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – बनावट नोटा बाळगणाऱ्या व त्या नोटा खऱ्या असल्याचे भासवून चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला सत्र न्यायालयाने सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. या निकाला विरोधात तिने उच्च न्यायालयात अपिल केले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही शिक्षा कायम ठेवत तिचे अपील फेटाळून लावले. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला.

पद्मा अरुण ठवरे (वय -४४ रा. टेका नाका, पाचपावली) असे शिक्षा झालेल्या महिला आरोपीचे नाव आहे. आरोपी महिलेने १४ जुलै २०१७ रोजी भाऊराव मेश्राम यांच्या सुशांत स्टिल सेंटरमधून ३०० रुपयांची भांडी खरेदी केली व मेश्राम यांना दोन हजार रुपयांची नोट दिली. मेश्राम यांना त्या नोटेवर संशय आला. त्यामुळे त्यांनी महिलेला ओळख विचारली व पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी मेश्राम यांच्या दुकानात पोहचून पद्माची झडती घेतली असता तिच्याकडे दोन हजार रुपयांच्या आणखी तीन बनावट नोटा आढळून आल्या. या प्रकरणात ५ फेब्रुवारी २०१८ रोजी सत्र न्यायालयाने पद्माला ७ वर्षे सश्रम कारावास व अन्य शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध तिने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने तिचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us