तरुणीची मदत करणारा निघाला मोबाईल चोरटा, सत्कारानंतर हाती पडल्या बेड्या

वाळूंज : पोलीसनामा ऑनलाइन – प्रियकराने वाऱ्यावर सोडल्यानंतर परप्रांतीय तरुणीला सुखरूपपणे पोलिसांच्या स्वाधीन करणारा उद्योगनगरीतील रिक्षाचालक चक्क मोबाइल चोरटा निघाल्यामुळे पोलीसही अवाक् झाले. चांगले काम केल्यानंतर सत्कार करणाऱ्या पोलिसांनी गुन्ह्यात सापडल्यानंतर त्यास बेड्या ठोकल्या आहेत.

अशोक बबनराव पानखेडे (19, रा. रांजणगाव) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज एमआयडीसीत आठवडाभरापूर्वी विश्वास वंजारे या लघुउद्योजकांचा महागडा मोबाईल चोरट्याने खिशात हात घालून पळविला होता. वंजारे यांनी त्या चोरट्याचा पाठलागही केला. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन तो पळून गेला. हा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. लांबविलेला मोबाईल आरोपीने बंदच ठेवल्यामुळे त्याचा शोध लागत नव्हता. पोलिसांनी बातमीदाराच्या मदतीने माहिती मिळाली होती. त्यानुसार, संशयित अशोक बबनराव पानखेडे (19, रा. रांजणगाव) या अ‍ॅपेरिक्षा चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यास पोलिसी खाक्या दाखविताच त्याने वंजारे यांचा 27 हजारांचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली. मोबाईल पोलिसांना काढून दिला. पोलीस निरीक्षक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन ओगले, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय होनवडतकर, कय्युम पठाण, पोना फकीरचंद फडे आदींनी ही कारवाई केली.

चोरट्यानेच तरुणीला केली होती मदत
विशेष म्हणजे मोबाइल लांबविणाऱ्या रिक्षाचालक अशोक पानखेडे याने दोन महिन्यांपूर्वीच प्रियकराने वाऱ्यावर सोडलेल्या एका परप्रांतीय तरुणीस मदत करीत एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केले होते. याबद्दल पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी त्याचा पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन सत्कार करीत शाबासकी दिली होती. आता चोरीत पकडला गेल्यानंतर त्याने मी पूर्वी पोलिसांची मदत केली, आता मला सोडा असा गयावया करू लागला होता.