नवी मुंबईकरांच्या जीवाला धोका, वापरलेले वैद्यकीय हातमोजे विकणारा गजाआड

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाणारे हातमोजे पुन्हा वापरात आणले जात होते. अशा जुन्या हातमोज्यांची विक्री करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून जुने व नवे असे एकूण चार क्विंटल वैद्यकीय हातमोजे आढळून आले आहेत. प्रशांत अशोक सुर्वे (रा. सीबीडी सेक्टर 9) असे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

डॉक्टरांनी वापरलेले हातमोजे धुवून पुन:वापरात आणण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांनी पवणे एमआयडीसी येथे छापा टाकला. पोलिसांनी तब्बल 263 गोणी वापरलेले हातमोजे जप्त केले. अंदाजे चाल लाख रबरी हातमोज्यांसह ते धुण्यासाठी वापरण्यात आलेल्या 2 वॉशिंग मशीन, हातमोजे सुकवण्यासाठी वापरण्यात आलेले 3 ब्लोअर मशीन असे एकूण 6 लाख 10 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलिसांनी याप्रकरणात प्रशांत सुर्वेला अटक करत गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबई पोलिसांनी वापरलेले वैद्यकीय हातमोजे कोठून आलणे व ते कोठे विकणार होता याची चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक हातमोजे विकल्याचे समोर आले आहे. यामागे मोठ्या टोळीचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सुर्वे याच्याविरोधात तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अशा प्रकारे जीवाशी खेळ होऊ शकतो यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.