सीसीटीव्हीच्या फुटेजमुळे अडकला ‘अपंग चोरटा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ज्याला धड उभे राहण्यासाठी पाय नाहीत, तो काऊंटरमधील रोकड आणि उंचावर असलेल्या बॉक्समधील मोबाईल कसा चोरुन नेईल, असा संशय कोणालाही येईल. सुदैवाने रात्रीच्या वेळी जेव्हा चोरी झाली, तो दुकानातील सीसीटीव्ही सुरु होता. त्यामुळे ही चोरी कोणी केली ते लक्षात आले. पण, त्या अपंगाचा शोध घेण्याचे अवघड काम पोलिसांवर आले. समर्थ पोलिसांनी तब्बल एक महिना चिकाटीने पुणे, मुंबई येथे तपास करुन गुजरातमधून या अपंगाला अटक केली. विजयभाई मशरुभाई जिलिया (वय २०, रा.नवसारी, गुजरात) असे त्याचे नाव आहे.

रास्ता पेठेतील न्यू हॅलो मोबाईल शॉपी हे मुश्ताक शमशुद्दीन मोमीन (वय ४०, रा. बालाजी दर्शन, कात्रज) यांचे दुकान बंद असताना ३० ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजून ४१ मिनिटांनी दुकानाच्या शटरच्या लोखंडी पट्ट्या तोडून चोरी झाली होती. दुकानातील १३ मोबाईल व रोख रक्कम असा १ लाख ४१ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता.

समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे यांच्याकडे याचा तपास आला. दुकानातील ही चोरी कोणीतरी सराईत चोरट्याने केली असावी, असा त्यांचा प्रथम समज झाला. दुकानातील सीसीटीव्ही पाहिल्यावर त्यांना चांगलाच धक्का बसला. सीसीटीव्ही नसता तर ही चोरी एका अपंगाने केल्याचे दिसून आले. दोन्ही पायाने अपंग असलेल्या या चोरट्याचा माग काढण्यास सुरुवात केली. तेव्हा तो पुणे रेल्वे स्टेशनवर गेल्याचे समजले. पुणे रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीची तपासणी केल्यावर त्यांना एका ठिकाणी तो तीन चाकी गाडीवरुन जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर तो मुंबईला गेल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी आपला तपासाचा मोर्चा मुंबईकडे वळविला. मुंबईतील सीएसटी रेल्वे स्टेशनवरी शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने त्याचा शोध सुरु झाला. हा अपंग चोर सीएसटी रेल्वे स्टेशनवर उतरला व त्यानंतर तो तेथे फिरुन नंतर गुजरात येथे गेल्याचे लक्षात आले.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुजरातमधील नवसारी गाठले. तेथे त्यांना हिऱ्यांना पैलु पाडणाऱ्यां कारखान्यात तो बिगारी काम करायचा अशी माहिती मिळाली. अशाच एका कारखान्यातून आरोपी हा जुनी दुचाकी घेण्याचा प्रयत्न करीत होता. व त्याने ज्यांच्याशी संपर्क साधला होता. अशा काही लोकांची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांना आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज दाखविले तेव्हा त्यांनी त्याला ओळखून तो विजयभाई जिलिया असल्याचे सांगितले.

नवसारी पोलिसांच्या मदतीने पोलीस उपनिरीक्षक कापुरे व त्यांचे सहकाऱ्यांनी संबधित परिसर तपासण्यास सुरुवात केली. आरोपी हा एका पडीक जागेत ओढ्याचे काठी बांधलेल्या झोपडीत राहत असल्याचा दिसून आला. त्याच्याकडे चौकशी केल्यावर व सीसीटीव्ही फुटेज दाखविल्यावर त्याने गुन्हा कबुल केला. घरासमोर जळाऊ लाकडाच्या खाली लपवून ठेवलेले ११ मोबाईल व २६ हजार ७०० रुपये असा एकूण १ लाख २५ हजार ७०० रुपयांचा माल काढून दिला. त्याला नवसारीहून अटक करुन पुण्यात आले आहे.

समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे व त्यांचे सहकारी हवालदार सुशील लोणकर, संतोष काळे,राजस शेख, प्रमोद टिळेकर, पोलीस शिपाई गणेश कोळी, सुमीत खुट्टे, साहिल शेख, अनिल शिंदे, सचिन पवार, निलेश साबळे, स्वप्नील वाघोले यांनी ही कामगिरी केली आहे.

Visit : Policenama.com