माजी खा. चंद्रकांत खैरेंची ‘खदखद’, म्हणाले – ‘स्मशानात जाईपर्यंत शिवसैनिकच राहील’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने राज्यसभेसाठी प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राज्यसभेसाठी संधी न मिळाल्याने माजी खासदार चंद्रकांत खैरे नाराज झाले आहेत. मला नाही, मात्र माझ्या शहराला खासदारकीची आवश्यकता होती. आदित्य साहेबांना आवडलं नाही. मी माझं काम करत राहील. मी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर अनेक वर्षे काम केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत देखील काम केलं. त्यांना आता वाटत की नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. पण मी स्मशानात जाईपर्यंत शिवसैनिक राहील. मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे, संधी मिळाली असती तर लढायला बळ मिळालं असतं, अशी खदखद चंद्रकांत खैरे यांनी बोलून दाखवली आहे.

शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे आणि दिवाकर रावते यांची नावे चर्चेत असताना लोकसभेपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली. तर दुसरीकडे भाजपने औरंगाबादचे माजी महापौर भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर केली. भाजपने यापूर्वी रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली होती. दरम्यान, एकनाथ खडसे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याची चर्चा होती. मात्र, भाजपने कराड यांना उमेदवारी जाहीर करून खडसे यांचा पत्ता कट केला. तर काँग्रेसने राजीव सातव यांचं नाव घोषित केलंय. मात्र, महाविकास आघाडीच्या चौथ्या जागेचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. ही जागा कोणत्या पक्षाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मला अनेक ऑफर होत्या
शिवसेनेकडून राज्यसभेची संधी हुकल्याने नाराज चंद्रकांत खैरे यांनी प्रियांका चतुर्वेदी यांच्यावर निशाणा साधला आहे. आता ही बाई खूप चांगलं काम करेल. हिंदी बोलते, इंग्रजी बोलते हरकत नाही. पण मी वीस वर्षे लोकसभा गाजवली. मी इकडे तिकडे कधी गेलो नाही. मला अनेक ऑफर होत्या. मरेपर्यंत शिवसैनिक राहील. बाकीचे येतात आणि जातात. कितीजण गेले. लोकांच्या सेवेसाठी आघाडीसोबत गेले, अशी खदखद खैरे यांनी व्यक्त केली.