१८ वर्षाच्या कारकिर्दीत त्याने ८ हिट चित्रपट दिले. सुरवातीच्या ४ वर्षाच्या करिअरमध्ये त्याचे १७ चित्रपट एकापाठोपाठ फ्लॉप ठरले. त्यानंतर २००४ साली ‘धुम’ चित्रपटाने त्याच्या करियरला कलाटणी दिली हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यानंतर त्याने ‘बंटी और बबली’, ‘युवा’, ‘ब्लफमास्टर’, ‘गुरू’ आणि दोस्ताना यासारखे हिट चित्रपट बॉलिवूडला दिले.
अमिताभ बच्चनसोबत ‘पा’ चित्रपटात त्यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला. या चित्रपटासाठी अभिषेक बच्चनच्या नावाची ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. एका मुलाखतीत त्याने आपल्या १८ वर्षाच्या करियर मधील कठीण प्रसंगाविषयी सांगितले होते की, जेव्हा तुमचे एकापाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप होत जातात, तेव्हा लोक तुमचा फोन देखील उचलत नाहीत. आपण फ्लॉप ठरतोय, ही भावना खरंच खूप वेदनादायी असते.
सुरवातीच्या काळात जेव्हा अभिषेकचे चित्रपट फ्लॉप व्हायला लागले होते, तेव्हा त्याने ‘एलआयसी एजंट’ म्हणूनही काम केले होते. अभिनयाव्यतिरिक्त अभिषेकला विविध देशांचे बोर्डिंग कार्ड जमा करण्याचा छंद आहे. काही वर्षापूर्वी करिश्मा कपूर सोबतच्या नात्यामुळे तो चर्चेत आला होता. अमिताभ बच्चन यांच्या ६० व्या वाढदिवशी त्याने करिश्मासोबत साखरपुडा केला होता मात्र, तीन महिन्यातच त्यांचे नाते तुटले आणि दोघे वेगळे झाले.
लग्ना आधी अभिषेक आणि ऐश्वर्याने अनेक चित्रपटात एकत्र काम केले होते. परंतु ‘धुम-२’ नंतर आणि ‘गुरू’ चित्रपटाच्या दरम्यान त्यांच्या मध्ये प्रेमाचे नाते बहरत गेले. यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. २० एप्रिल २००७ साली दोघांनीही लग्नगाठ बांधली. त्यावेळी ऐश्वर्या ३३ वर्षाची होती, तर अभिषेक ३१ वर्षाचा होता.
लग्नाच्या बारा वर्षानंतर ऐश्वर्याने खुलासा करत सांगितले की, अभिषेकने तिला कसे प्रपोज केले. एका मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितले अभिषेकने गुरु चित्रपटाच्या रिलीज आगोदर न्यूयॉर्क येथे एका हॉटेलच्या रूममधील बाल्कनीत त्याने मला प्रपोज केले. त्यावेळी अभिषेक एक हॉलीवूडचा रोमँटिक हिरो वाटत होता. आता अभिषेकच्या या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या रायने सोशल मीडियावर ‘बेबी’ असं कॅप्शन देत त्याच्या लहाणपणाचा एक खास फोटो शेअर केला आहे. तर बहिण श्वेता नंदा हिने अभिषेकचा एक फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.