वाढदिवस विशेषांक : भारतातील अणुऊर्जा प्रकल्पाचे जनक – डॉ. होमी जहांगीर भाभा

पोलीसनामा ऑनलाईन  – प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ ,अणुऊर्जेच्या शांततामय उपयोगाचे पुरस्कर्ते आणि भारतातील अणुसंशोधन व अवकाश संशोधन कार्यक्रमाचे प्रमुख शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा आज जन्मदिन.

डॉ होमी भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर इ.स. १९०९ रोजी झाला. ते भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेता मानले जातात.

शैक्षणिक पार्श्वभूमी –

भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. वडील जहांगीर भाभा हे बॅरीस्टर होते. त्यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिक शास्त्रातच विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनियरींगची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रीज विद्यापिठातून इ.स. १९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली.

कारकीर्द –

इ.स. १९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इ.स. १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे तेच संचालक म्हणून काम पाहू लागले.
भारतात ‘अणुपर्वा’ चा प्रारंभ करणारे डॉ. भाभा १९४८ मध्ये स्थापन झालेल्या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष झाले. पुढे अणुऊर्जा खात्याचे सचिवही झाले.

Advt.

अणुभट्टी स्थपणा –

डॉ. होमी भाभांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणुभट्टीची स्थापना होऊ शकली. त्यांच्यामुळेच १९५६ मध्ये आशियातील पहिली अणुभट्टी तुर्भे येथे उभारली गेली आणि भारताच्या अणुऊर्जा संशोधन पर्वाची सुरुवात झाली.

अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे, इ.स. १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला.

१९५१ मध्ये ते भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष झाले. भारताला आण्विक सामर्थ्यांने सिद्ध झालेला पाहण्याची स्वप्ने पाहणारा हा शास्त्रज्ञ दि. २४ जानेवारी १९६६ रोजी स्वित्झर्लंडलँड येथील ‘माँट ब्लॉक’ या शिखरावर झालेल्या विमान अपघातात वयाच्या ५३ व्या वर्षी मृत्युमुखी पडला. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तुर्भे येथील अणु संशोधन केंद्राला १२ जानेवारी १९६७ रोजी ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’ असे नामकरण करण्यात आले.

पुरस्कार –

संशोधन क्षेत्रातील कार्याबद्दल ‘अॅडम्स पारितोषिक’, ‘हॉपकिन्स पारितोषिक’, ‘पद्मभूषण’ इत्यादी अनेक पुरस्कार लाभले. भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्षस्थान ही त्यांनी भूषविले. अणूचा शांततेसाठी उपयोग करण्याच्या धोरणासंबंधी चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे ते अध्यक्ष होते. डॉ. भाभांचे चित्रकार, संगीतरसिक, वृक्षप्रेमी असे अनेक पैलू असलेले व्यत्तिमत्त्व होते.