पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस, देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने 14 सप्टेंबरपासून भाजप एक आठवड्याचे सेवा कार्य करत आहे. राष्ट्रीय स्तरापासून राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर सेवा कार्य केले जात आहे.

भाजपने पंतप्रधान मोदींच्या 70व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुका पातळीवर किमान 70 गरजूंची सेवा करण्याचे निर्देश दिले आहेत. दिव्यांगांसाठी शिबिर आयोजित करुन त्यांना आवश्यक उपकरणे दिली जाणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील 70 ठिकाणी स्वच्छतेचा कार्यक्रम, फळांचं वितरण, रुग्णालयातील रुग्णांची देखभाल आणि रक्तदान असे कार्यक्रम होणार आहेत.

भाजपच्या दिल्ली कार्यालयात आज कार्यकर्ते केक कापणार आहेत. तर दुपारी चार वाजता चांदनी चौकमध्ये एका कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दिव्यांगांना 70 उपकरण वितरित करणार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांकडून दुपारी 12 वाजता एक व्हर्च्युअल कार्यक्रम होणार आहे. दुपारी 12.30 वाजता केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, डॉ जितेंद्र सिंह आणि भाजप खासदार मनोज तिवारी विविध सामाजिक संघटनांच्या मदतीने पाकिस्तानहून आलेल्या हिंदू शरणार्थींना मजलिस पार्क कॅम्प, आदर्श नगर, नवी दिल्लीत शिलाई मशीन, ई-रिक्षा आणि जेवणाच्या वस्तूंचे वितरण करणार आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाआधी तामिळनाडूच्या भाजप कार्यकर्त्यांनी 70 किलोंचा लाडू श्री कामाक्षी अम्मन मंदिरात अर्पण केला आहे. मागच्या वाढदिवसाला पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये गेले होते. सरदार सरोवर धरणावरील नर्मदा देवीच्या महाआरतीमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा नरेंद्र मोदी यांचा प्रवास आहे.

नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताचे चौदावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. बालपणापासूनच त्यांचा ओढा संघाकडे होता. गुजरातमध्ये आरएसएसचा मजबूत आधारही तेच होते. 1967 मध्ये वयाच्या 17 वर्षी ते अहमदाबादला आले आणि त्याच वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य बनले. यानंतर 1974 मध्ये ते नवनिर्माण आंदोलनात सहभागी झाले. अशाप्रकारे सक्रिय राजकारणात येण्याआधी नरेंद्र मोदी अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे प्रचारक होते.