हॅप्पी बर्थडे ! बोटाला दुखापत झाल्यामुळे रोहित बनला ‘हिटमॅन’

पोलिसनामा ऑनलाईन – टीम इंडियाचा सलामीवीर आणि मुंबईकर रोहित शर्माला पहिल्यांदा गोलंदाज म्हणून कारकीर्द घडवायची होती. ज्युनिअर क्रिकेट खेळताना तो गोलंदाजीही करायचा. 2005 साली श्रीलंकेची ज्युनिअर टीम भारत दौर्‍यावर आली होती. एका वन-डे सामन्यादरम्यान रोहितच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. ही दुखापत इतकी गंभीर होती की रोहितला चेंडूवर ग्रिप बसवणे शक्य झाले नाही. यानंतर रोहितने फलंदाजीकडे आपला मोर्चा वळलला आणि यानंतर आज रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक यशस्वी फलंदाज म्हणून ओळखला जातो.

रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आक्रमक फलंदाजीच्या जोरावर रोहितने टीम इंडियात सलामीवीर म्हणून आपली जागा पक्की केली आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजावर तुटून पडत आक्रमक फटकेबाजी करणारा रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिटमॅन नावाने ओळखला जातो. मधल्या फळीतला फलंदाज ते सलामीचा फलंदाज असा रोहितचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला इतिहास फारच रोचक आहे.

रोहितचा जन्म 30 एप्रिल 1987 साली नागपूर शहरात झाला. भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करण्यासोबत रोहित स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये मुंबईच्या संघाकडून खेळतो. वन-डे क्रिकेटमध्ये 3 द्विशतक 2019 विश्वचषकातली 5 शतके असे अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. याव्यतिरीक्त आयपीएलमध्येही रोहितने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना आपल्या संघाला चारवेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. आतापर्यंत कोणत्याही कर्णधाराला अशी कामगिरी करणे जमले नाही. 13 डिसेंबर 2015 साली रोहितने जवळची मैत्रिण रितीकाशी लग्न केले. 2018 साली रोहित-रितीकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला.