‘हे’ गृहमंत्री फक्त पुष्पचक्र वाहायला जातात : शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गडचिरोलीतील माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्‍यांवर पुन्हा एकदा हल्ला केला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्‍यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही अशा शब्दात लक्ष केलं आहे. एक गृहमंत्री तेथे विकासकामं, आणि लोकांचा व अधिकाऱ्यांचा विश्वास वाढवायला जायचा. हे गृहमंत्री मात्र तेथे फक्त पुष्पचक्र वाहायला जातात. असा घणाघात पवार यांनी केला आहे.

आर. आर. पाटील गडचिरोलीचं पालकमंत्री पद मागायचे

दिवंगत आर. आर. पाटील हे गडचिरोलीचे नव्हते. परंतु तरीही ते या विभागाचे पालकमंत्री पद मागायचे. त्याचा आग्रह धरायचे. महिन्यातून एक ते दोन वेळा गडचिरोलीत असायचे. भामरागडच्या दूर्गम भागात गृहमंत्री पाटील लोकांना धीर देण्यासाठी मोटरसायकलवर जायचे. अशी आठवण करून देत आताचे गृमंत्री अपयशी आहेत असे शरद पवार यांनी दाखवून दिले.

प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा नसून विकासाच्या नाराजीचा आहे

राज्य सरकारची जबाबदारी जेव्हा माझ्याकडे होती. तेव्हा पोलीस अधिकारी व आयएएस अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठका घेतल्या. हा प्रश्न केवळ कायदा सुव्यवस्थेचा नसून विकासाच्या बाबतीत एखादा परिसर मागे राहिल्याने निर्माण झालेल्या नाराजीतील आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेचा फायदा घेत विकास नको आणि परिस्थिती तशीच राहावी या विचारातून नक्षल प्रवृत्ती पुढे आली आहे.हे लक्षात घेऊन गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांसाठी विकासाचे स्वतंत्र बजेट दिले होते. असे पवारांनी सांगितले.

हे गृहमंत्री केवळ पुष्पचक्र वाहायला जातात

आर. आर. पाटील नक्षलग्रस्त भागातील लोकांचा, अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी जायचे. तेथील विकासकामांना गती देण्यासाठी, नक्षलवादी कारवाया थांबाव्यात म्हणून जीवापाड मेहनत करत असत. आणि दुसऱा गृहमंत्री या भागात केवळ पुष्पचक्र वाहायला जातो. असंही ते म्हणाले.