विम्याचे २ लाख रूपये देत नाही म्हणून सुनेला बेदम मारहाण

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन (हनुमंत चिकणे ) – मयत पतीचे मिळालेले विम्याचे २ लाख रूपये देत नाही या कारणावरून चिडून सासू, सासरा, दिर व त्याचा मुलगा यांनी सुनेसह तिचा भाऊ व आईस लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना थेऊर (ता. हवेली ) येथे मंगळवारी (ता. १९ ) दुपारी घडली.

याप्रकरणी सिमा रामदास जाधव ( वय ३४, रा, जाधववाडी, थेऊर, ता. हवेली ) यांनी लोणी काळभोर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी सासरे सखाराम साहेबराव जाधव, सासू अरूणाबाई सखाराम जाधव, दिर विनायक साहेबराव जाधव व त्याचा मुलगा शशिकांत विनायक जाधव (रा. जाधववाडी, थेऊर, ता. हवेली) या चौघा विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या महितीनुसार, सीमा जाधव यांच्या पतीचे दोन वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यानी विमा पॉलिसी काढली होती. त्यांचे मृत्यूनंतर सदर पॉलिसीची २ लाख रुपये रक्कम वारसदार म्हणून त्यांची पत्नी सिमा यांना मिळाली आहे. सदर रक्कम मिळावी म्हणून सासरे सखाराम, सासू अरूणाबाई, ननंद रूपाली संजय चव्हाण हे सिमा हिस सतत शिवीगाळ करत होते. परंतू ही रक्कम दोन मुले व एका मुलीच्या भवितव्यासाठी ठेवले आहेत हे सतत सांगत होती.

मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सीमा यांचे बंधु रामदास चव्हाण हे बहिणीला कामानिमित्त भेटण्यासाठी येत असताना वाटेमध्ये सखाराम जाधव यांनी त्यांची दुचाकी अडवून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तुझी बहीण २ लाख रुपये का देत नाही, बघतो तुझ्याकडे म्हणून काठीने मारण्यास सुरुवात केली. तेव्हा सीमा व त्याची आई भांडण सोडवण्यासाठी आल्या असता सखाराम जाधव यांनी काठीने तर सासू अरुणाबाई जाधव, दीर विणायक जाधव व त्यांचा मुलगा शशिकांत जाधव यांनी हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूरज बंड्गर करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like