‘त्या’ वादानंतर मी आणि लोकेश राहुल महिनाभर बोललो नाही : हार्दिंक पांडया

पोलिसनामा ऑनलाईन टीम – ‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या शोमध्ये हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना करण जोहरने एक प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना हार्दिक पांड्याने महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे लोकेश राहुल त्यावर हसला. त्यामुळे या दोघांवर प्रचंड टीका झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. पण नंतर काही दिवसांनी या दोघांना आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. त्या वादाच्या प्रसंगानंतर काही दिवस कसे गेले? याबद्दल हार्दीकने अनुभव सांगितला आहे.

संबंधित प्रकरणानंतर माझ्यासाठी जे झाले ते घडून गेले. मला निलंबनाच्या शिक्षेनंतर थेट टीम इंडियात संधी मिळाली. राहुलला मात्र भारत अ संघाकडून खेळावे लागले. पण त्यामुळे आमच्या मैत्रीत अजिबात अंतर पडले नाही. घडलेल्या प्रकरणानंतर आम्ही एकमेकांशी महिनाभर एक शब्दही बोललो नाही. महिनाभर आम्ही एकमेकांपासून ‘ब्रेक’ घेतला, हा महत्वाचा बदल हार्दीकने सांगितला. एवढे घडून गेल्यावरही आमची मैत्री मात्र बदलली नाही. फक्त राहुल त्या प्रकरणानंतर आधीपेक्षा खूप शांत स्वभावाचा झाला. पण एकमेकांवरचं प्रेम अजिबात कमी झालेले नाही, असे त्याने स्पष्ट केले.

दोघांना आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आल्यानंतरही त्यांच्यापुढील अडचणी संपलेल्या नव्हत्या. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या लोकपालांनी या दोघांना नोटीस बजावली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी 20 मालिका आणि न्यूझीलंड दौरा होण्याआधी हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांच्यावरील बंदी उठवण्यात आली होती. दोघांना बिनशर्त माफी मागण्याचे आणि 10 लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश देण्यात आले.