दुर्दैवी : हारतालिकाचं विसर्जन करताना दोन मुलांसह दोन महिला नदीत गेल्या वाहून

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – हिंगणघाट येथे हारतालिका विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन महिलांसह दोन लहान मुले नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घटली आहे. या घटनेमुळे हारतालिका विसर्जनाला गालबोट लागले आहे. बुडालेल्या चौघापैकी एका महिलेचा मृतदेह सापडला असून अद्याप तीनजण बेपत्ता आहेत. बेपत्ता तिघांचा शोध एनडीआरएफची टीम घेत असून घटनास्थळी स्थानिक आमदार, पोलीस आणि जिल्हाधिकारी दाखल झाले आहेत.

ही दुर्दैवी घटना आज (सोमवार) दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली. घरी हरतालिकेची पुजा करून शास्त्री वार्डातील काही महिला वणा नदीच्या रेल्वे पुलाजवळील कवडघाट येथे हरतालिकेचे विसर्जन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत दोन लहान मुलंही होती. विसर्जन करताना एक मुलगा पाय घसरून पाण्यात पडला. तो वाहून जात असताना त्याला वाचवण्यासाठी त्याची बहीण नदीपात्रात गेली. तिला वाचवण्यासाठी आईने नदीत उडी घेतली आणि त्यांना वाचवण्यासाठी दुसरी महिला पाण्यात गेली. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात सर्वजण नदीच्या पाण्यात वाहून गेले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील वणा नदी पुलाजवळ एक महिला वाहून जाताना पोलिसांना दिसली. त्याचवेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेऊन या महिलेला पाण्याबाहेर काढले. तिला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषीत केले. दरम्यान, उर्वरीत तिघांचा शोध घेण्यासीठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले. एनडीआरएफच्या टीमकडून बेत्ता तिघांचा शोध घेण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –