Kumbh Mela 2021 : दर 12 वर्षांनी का लागतो कुंभमेळा ? जाणून घ्या या मागील रहस्य

हरिद्वार : वृत्तसंस्था – हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. 83 वर्षानंतर 12 ऐवजी 11 वर्षांच्या अंतराने कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. कुंभमेळा जगभरात कोणत्याही धार्मिक हेतुने आयोजित केलेला सर्वात मोठा सोहळा आहे. कुंभचे पर्व प्रत्येक 12 वर्षाच्या अंतराने चारपैकी एका नदीच्या किनार्‍यावर साजरा केला जातो. ही ठिकाणे आहेत हरिद्वारमध्ये गंगा, उज्जैनमध्ये शिप्रा, नाशिकमध्ये गोदावरी आणि अलाहाबादमध्ये त्रिवेणी संगम जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती एकत्र येते.

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, जेव्हा गुरू कुंभ राशीत आणि सूर्य मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. प्रयागचा कुंभमेळा सर्व मेळ्यांमध्ये सर्वाधिक महत्वाचा आहे. कुंभाचा अर्थ आहे – कलश, ज्योतिष शास्त्रात कुंभ राशीचे सुद्धा हेच चिन्ह आहे. कुंभमेळ्याची पौराणिक कथा अमृत मंथनाशी संबंधीत आहे.

देव आणि राक्षसांनी समुद्राचे मंथन आणि त्याद्वारे प्रकट झालेली सर्व रत्न आपसात वाटून घेण्याचा निर्णय घेतला. समुद्राच्या मंथनातून जे सर्वात मौल्यवान रत्न निघाले ते होते अमृत. हे पिण्यासाठी देव आणि राक्षसांमध्ये संघर्ष झाला.

राक्षसांपासून अमृत वाचवण्यासाठी भगवान विष्णुंनी ते पात्र आपले वाहन गरुडाला दिले. राक्षसांनी जेव्हा गरुडाकडून ते पात्र हिसकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या पात्रातून अमृताचे काही थेंब अलाहाबाद, नाशिक, हरिद्वार आणि उज्जैनमध्ये पडले. तेव्हापासून प्रत्येक 12 वर्षांच्या अंतराने या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो.

या कुंभासाठी देव आणि दैत्यांचे युद्ध 12 दिवसांपर्यंत 12 ठिकाणी चालले आणि त्या ठिकाणी सुद्धा कुंभातून अमृताचे काही थेंब सांडले ज्यापैकी चार ठिकाणे मृत्युलोकात आहेत, तर उर्वरित आठ ठिकाणे अन्य लोकात म्हणजे स्वर्ग इत्यादीमध्ये असल्याचे मानले जाते. 12 वर्षांत देवतांचा 12 दिवस मान असतो. यासाठी 12 व्या वर्षीच सामान्यपणे प्रत्येक ठिकाणी कुंभमेळा होतो.