हर्षवर्धन जाधव यांचा पोलिस मारहाण प्रकरणातील जामीन रद्द करण्याची मागणी, अटकेची शक्यता

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुन्हा अटक होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा गैरवर्तन केल्याचा आरोप सरकारी वकिलाकडून करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी पोलिसांना केलेल्या मारहाण प्रकरणातील त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. यामुळे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांना केलेल्या मारहाण प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांना पुन्हा गैरवर्तन न करण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला होता. पण आता तोच जामीन अर्ज रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात सरकारी वकील डी आर काळे यांनी अर्ज केला आहे. हर्षवर्धन जाधव यांच्याकडून गैरवर्तन झाल्याचा आरोप सरकारी वकील डी आर काळे यांच्याकडून करण्यात येत आहे. तसेच मंजूर झालेला जामीन रद्द का करु नये, यासाठी हर्षवर्धन जाधव यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

दुचाकीस्वार मारहाण प्रकरण
काही दिवसांपूर्वी एका किरकोळ अपघाताच्या वादातून हर्षवर्धन जाधव यांनी एका दुचाकीस्वाराला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी अटक टाळण्यासाठी आपल्या छातीत दुखत असल्याचे कारण सांगितले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी हर्षवर्धन यांची ससूनमध्ये तपासणी करुन त्यांना अटक केली होती. हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या सहकारी इशा झा या दोघांविरोधात अमन अजय चड्डा यांनी तक्रार दाखल करण्यात आली होती. अमन अजय चड्डा यांनी आपले आई वडील जखमी झाल्याचे आपल्या तक्रारीत म्हणले आहे.

कोण आहेत हर्षवर्धन जाधव ?
हर्षवर्धन जाधव हे काँग्रेस नेते रायभान जाधव यांचे सुपुत्र आहेत.
हर्षवर्धन जाधव हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.
हर्षवर्धन जाधव हे २००९ मध्ये मनसेच्या तिकिटावर कन्नड विधानसभा मदारसंघातून निवडून आले होते. पण त्यांनी पक्षांतर्गत मतभेदामुळे ५ वर्षांच्या आतच मनसेला सोडचिठ्ठी दिली.
मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली पण त्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा त्यांना शिवसेनेच्या उदयसिंग राजपूत यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.