काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील 11 सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार ?

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन (सुधाकर बोराटे) – आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनूषंगाने राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन पुढील राजकीय वाटचालीबाबत व भाजप पक्ष प्रवेशाबाबतची चर्चा केल्याने हर्षवर्धन पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आलेले असतानाच हर्षवर्धन पाटील यांचे मुंबईहुन इंदापूरात आगमन झाले. त्यानंतर शनिवार रात्री हर्षवर्धन पाटील यांनी मोटारसायकल रॅली काढून इंदापूरातील ३५ गणेश मंडळांना भेटी देवुन तेथील गणेशाची आरती करून गणरायाचे दर्शन घेतल्याने तालुक्यातील जाणकारांमध्ये चर्चेला उधाण आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
Harshwardhan-Patil
पाटील यांचे इंदापूरात आगमन झाल्यानंतर शनिवार रात्री इंदापूर शहरातील सुमारे ३५ गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन आरती केल्या. शनिवारी सायंकाळी ६:१० मिनीटांनी इंदापूरातील राजेवलीनगर येथिल राजेवली गणेश मंडळाची पहीली आरती करून पाटील यांनी रॅलीला सुरूवात केली. त्यानंतर शिवज्योत गणेश मंडळ सरस्वतीनगर, कै.पांडूरंग अण्णा फडतरे मित्र मंडळ, रामवेसनाका, धर्मवीर संभाजी गणेश मंडळ, संभाजी चौक, कसबा गणपती मित्र मंडळ, कसबा, नवयुवक मित्र मंडळ, पोरापोरांची चावडी, नेहरू चौक मित्र मंडळ, नेहरू चौक, श्रीमंत शिवराज गणेश मंडळ, मंडई, सिद्धीविनायक गणेश मंडळ, नागझरी मळा, संत सावतामाळी गणेश मंडळ माळी गल्ली, संत रोहीदास मित्र मंडळ, रोहीदास पथ, यासह ३५ गणेश मंडळांना भेटी देवुन व्यंकटेशनगर गणेश मित्रमंडळ व्यंकटेशनगर या ठिकाणी शेवटची आरती रात्री ११:१० वाजता करून गणेश भेट रॅलीची सांगता झाली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांचे गणेशोत्सव मंडळांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केले.
Harshwardhan-Patil
सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील हे राज्यामध्ये चर्चेत आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या गणेशोत्सव मंडळांना भेटीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले. शहरातील शिवराज गणेशोत्सव मंडळाने स्वच्छतेचा संदेश देणारा देखावा उभारला आहे, मंडळाच्या या उपक्रमाचे हर्षवर्धन पाटील यांनी भेटीदरम्यान कौतुक केले. श्रीगणेशाच्या आरती नंतर गणेशोत्सव मंडळांनी हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार केला. या भेटीदरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

शहरातील गणेशोत्सव मंडळाचे आरतीसाठी हर्षवर्धन पाटील यांनी बुलेट वरून प्रवास केला. या गणेशोत्सव भेटीच्या दौर्‍यात शहरातील नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर आगामी विधानसभेच्या निवडणूकीमुळे हर्षवर्धन पाटील यांची गणराया भेट रॅली चांगलीच चर्चेत आली असुन यादरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी शहरामध्ये ठीकठीकाणी भाजप कार्यकर्त्यांच्या व पदाधिकार्‍यांच्या भेटी घेवुन त्यांचेशी चर्चा केल्याने हर्षवर्धन पाटलांचा भाजप प्रवेश बळावला असुन येत्या ११ सप्टेंबर रोजी हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता विश्वसनिय सुत्रांकडून वर्तवली जात असल्याने तालुक्यात राजकीय वातावरण विधानसभे अगोदरच तापल्याचे चित्र पहायला मिळत आहे.