हर्षवर्धन जाधवांच्या आईचा आरोप, सासरे दानवेंच्या सांगण्यावरून मुलावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यावर त्यांचे सासरे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीच अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करायला लावला, असा गंभीर आरोप हर्षवर्धन जाधव यांच्या आई तेजस्विनी जाधव यांनी केला आहे. तसेच त्यांची सून संजना हिच्या विरोधातही क्रांतीचौक पोलीस ठाण्यात छळाची तक्रार देण्यात आली आहे. सोमवारी (दि.9) अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

हर्षवर्धन जाधव यांच्यावर एका पानटपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांना अटक होण्याची शक्यता आहे. तर हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या आई विरोधात रावसाहेब दानवे यांच्या मुलीने छळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली आहे. सासू-सूनेने एकमेकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्या आईने गंभीर आरोप केले आहे. काही दिवसांपूर्वी मनसे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन यांच्यावर एका पान टपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप झाला होता. रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यावरूनच मुलगा हर्षवर्धन यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप तेजस्विनी जाधव यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण ?
जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पानटपरी चालक नितीन रतन दाभाडे याने पोलिसांकडे तक्रार केली आहे. नितीन दाभाडे याने जिल्हा न्यायालयासमोर पानटपरी सुरु केली आहे. 29 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास हर्षवर्धन जाधव हे त्या ठिकाणी आले. त्यांनी ज्या जागी टपरी व निळा झेंडा लावला ती जागा माझ्या मालकीची असल्याचे सांगत टपरी व झेंडा हटवण्यास सांगितले. यावरुन दोघांमध्ये वाद झाले. याच वादातून जाधव यांनी टपरी चालक दाभाडेला जातीवाचक शिवीगाळ केली, अशी तक्रार दाभाडे याने क्रांतीचौक पोलीस ठाण्यात केली आहे. त्याच्या तक्रारीवरून हर्षवर्धन जाधव यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.