पाटील पिता-पुत्र नीरा-भीमाच्या संचालकपदी बिनविरोध

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथील नीरा भिमा सहकारी सहकारी साखर कारखान्याची सन 2020 ते 2025 साठी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आहे.कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 20 जागांसाठी 20 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले असल्याने निरा-भीमा कारखाण्याची 20 वर्षापासुनची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखत राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील व नुकताच राजकारणात प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांची नीरा-भीमा कारखाण्याच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या 20 वर्षापासुनची कारखान्याची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखत नीरा-भीमा कारखान्यावर पुन्हा एकदा आपले वर्चस्व अबाधित राखण्यात यश मिळविल्याने सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे या कारखान्याचे संस्थापक आहेत. स्थापनेपासून कारखान्याची 20 वर्षे निवडणूक बिनविरोध होत आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

इंदापूर तहसील कार्यालय येथे सोमवारी (दि.13 जानेवारी) उमेदवारी अर्जांची छाननी झाली. यामध्ये अपक्ष उमेदवाचा एक अर्ज बाद झाला. त्यामुळे 20 जागांसाठी 20 उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिल्याने कारखाना निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र दि.28 जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अधिकृत मुदत असल्याने बिनविरोध निवडणुकीची घोषणा करणेची केवळ औपचारीकता शिल्लक राहिलेली आहे.

नीरा-भीमा कारखान्याने स्थापनेपासून चांगले कामकाज करीत 20 वर्षांमध्ये शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केलेला आहे. तसेच सध्या राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत असल्याची जाण शेतकऱ्यांना आहे. या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यक्षेत्रातील 46 गावांमधील सभासदांनी व व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निवडणूक बिनविरोध करणेकरिता सहकार्याची भूमिका घेतली.

बिनविरोध निवड झालेले संचालक मंडळ पुढील प्रमाणे – हर्षवर्धन शहाजीराव पाटील, राजवर्धन हर्षवर्धन पाटील, प्रतापराव सर्जेराव पाटील, उदयसिंह विलासराव पाटील, प्रकाश शहाजी मोहिते, संजय तुळशीराम बोडके, हरिदास मारुती घोगरे, दादासो उत्‍तम घोगरे, मच्छिंद्र संताराम वीर, दत्तात्रय रामचंद्र शिर्के, लालासो देविदास पवार, कृष्णाजी दशरथ यादव, बबनराव आनंता देवकर, भागवत भानुदास गोरे, दत्तू यशवंत सवासे, चंद्रकांत रामचंद्र भोसले, संगिता दत्तात्रय पोळ, जबीन कमाल जामदार, कांतीलाल शिवाजी झगडे, विलास रामचंद्र वाघमोडे. बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –