काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील ‘रासप’कडं तिकीट मागत आहेत : मंत्री महादेव जानकर

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजप आणि शिवसेनेत जात असताना काल राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. इंदापूर येथे एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले कि, काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे रासपकडे तिकीट मागत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. इंदापूर तालुक्यातील एका गावातील चाराछावणीला भेट देण्यासाठी आले असता माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे.

भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या आमदारांच्या प्रवेशावर बोलताना जानकर म्हणाले कि, भाजप आणि शिवसेनेतील जागावाटप झाल्यानंतर आम्ही या पक्षांकडे जागा मागणार आहोत. आम्ही सध्या ५२ जागा मागितल्या असून भाजप प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील  यांच्याकडे आम्ही जागांची यादी दिली असून ते नंतर आम्हाला याविषयी कळविणार आहेत. त्याचबरोबर आम्ही या जागांमध्ये दौंड आणि इंदापूरची जागा प्रामुख्याने मागितली असल्याचे देखील त्यांनी म्हटले. जर आघाडीच्या जागावाटपात इंदापूरची जागा काँग्रेसला मिळली नाही तर हर्षवर्धन पाटील हे रासपकडून निवडणूक लढताना दिसून येऊ शकतात असे विधान जानकर यांनी केले आहे.

त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्याचबरोबर धनगर आरक्षणावर भाष्य करताना त्यांनी म्हटले कि, धनगर समाजाला एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या योजनांची घोषणा केली असून धनगर समाजाच्या विकासासाठी महाज्योती या संस्थेची निर्मिती केली असून या संस्थेमार्फत या समाजाच्या विकासाचे कार्य केले जाणार आहे.

चारा छावण्या राहणार सुरु

महाराष्ट्र्रात मोठ्या प्रमाणात पावसाने जोर धरला असला तरी राज्यातील काही भागात अजूनही पाऊस पडला नसल्याने ज्या दुष्काळी भागात चारा उपलब्ध नाही त्या भागातील चारा छावण्यांना मुदतवाढ देणार असल्याची घोषणा मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे. पुढील २ ते ३ महिने या छावण्यांना मुदतवाढ देणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –