माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मातृशोक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे माजी सहकारमंत्री व काॅग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री श्रीमती रत्नप्रभादेवी शहाजीराव पाटील ( वय ७४ वर्ष) यांचे आज मंगळवार (दि.१५) सायंकाळी पुणे येथे खासगी रूग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले आहे. बावडा ( ता.इंदापूर) येथिल रत्नाई निवासस्थानी बुधवारी (दि.१६) सकाळी १० वाजेपर्यंत रत्नप्रभादेवी पाटील यांचे पार्थिव हे नागरीकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

निवास्थानापासून सकाळी १० वा. अंत्ययात्रेस सुरूवात होईल.त्यानंतर बावडा येथिल इंदापूर- अकलूज रस्त्यावरील शहाजीबागेत सकाळी ११ वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील यांचेवर  गेल्या वीस दिवसांपासून पासून पुणे येथे खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते.अखेर मंगळवारी सायंकाळी रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालविली.त्यांच्या पाठिमागे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे पुत्र व चित्राताई कोरटकर आणि चेतना मोटे या दोन मुली आहेत.

तर भाग्यश्री पाटील ह्या त्यांच्या सून आहेत. माजी खासदार कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या त्या धाकट्या भावजय होत.तर दिवंगत लोकनेते शहाजीराव पाटील पाटील यांच्या पत्नी होत. रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनाचे वृत्त येताच बावडा गावातील अनेकांना अश्रू आवरले नाहीत. सर्वसामान्य जनतेशी त्यांची थेट संबंध होता.श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील ह्या सराटी येथील जगदाळे घराण्यातील होत.इंदापूर तालुक्यात भाभी नावाने त्या ओळखल्या जात.

बावडा ग्रामपंचायत, दूध संस्थांचे कामकाज त्यांनी हिरारीने सांभाळले. बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या त्या विद्यमान सदस्या होत. रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनाचे वृत्त येताच बावडा, शहाजीनगर तसेच तालुक्यात अनेक गावात  शोककळा पसरली आसुन आनेक ठीकाणी बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.