‘लॉकडाऊन’मध्ये भाजप नेता मैत्रिणीला भेटायला गेला, घराची बेल वाजताच मारली बाल्कनीतून उडी, पक्षाने केलं निलंबित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊन घोषित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना आपल्या घरात रहावे असे आवाहन केले आहे. आवश्यकतेशिवाय बाहेर न जाण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले आहे. परंत काही लोक गरज नसताना देखील बाहेर पडत आहे. हरियाणातील चंदीगडमध्ये असेच काहीसे पहायला मिळाले. भाजप नेता लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला आणि आपले हातपाय मोडून घेतले.

हरियाणा भाजप प्रदेश कार्यकारणी समितीचे विशेष आमंत्रित सदस्य आणि शुगरफेडचे माजी अध्यक्ष चंद्रप्रकाश कथुरिया हे चंदीगडच्या सेक्टर 63 मध्ये रहात असलेल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेले. लॉकडाऊन असताना देखील ते आपल्या मैत्रिणीला भटण्यासाठी गेले. मैत्रिणीच्या घरात बसले असताना कोणीतरी घराची बेल वाजवली. यामुळे ते घाबरुन गेले. आपण या ठिकाणी आहोत हे कोणाला कळू नये यासाठी त्यांनी बाल्कनीतून कपड्यांच्या दोरीने खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले.

जखमी अवस्थेत कथुरिया यांना मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आहे. त्याचवेळी कथुरिया यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणात त्यांना भाजपने पक्षातून निलंबित केले. पक्षाने त्यांना प्राथमिक सदस्यावरून निलंबित केले आहे. यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराल यांनी कथुरिया यांच्यावर कारवाईचे पत्र पाठवून त्यांना पक्षातून निलंबित केले. यानंतर काँग्रेसने यावर जोरदार हल्ला चढवत म्हटले आहे की, यापूर्वी भाजप अध्यक्षाच्या मुलाचे कृत्य समोर आले होते आता भाजप नेत्याचेच कृत्य समोर आले आहे. त्यामुळे नेत्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे.