पोलिसांचा अजब दावा, म्हणाले – ‘जप्त केलेली 29 हजार लिटर दारु उंदरांनी ढोसली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उंदराने सिंहाच जाळ कुरतडल्याची गोष्ट आपण सर्वांनी लहानपण ऐकली आहे. धान्यांच्या पोत्यापासून कपड्यांपर्यंत अनेक वस्तूंचा उंदरानी फडशा पाडल्याचेही आपल्या ऐकन्यात असेल. पण उंदराने दारु ढोसल्याची कधी कल्पना तुम्ही केली आहे का, ती पण थोडी-थोडकी नाही तर तब्बल 29 हजार लिटर दारु. उंदरांनी 29 हजार लिटर फस्त केल्याचा अजब दावा हरियाणा पोलिसांनी केला आहे.

हरियाणातील फरीदाबाद शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील पोलीस ठाण्याच्या गोडाऊनमधून 29 हजार लिटर दारूच्या बाटल्या आणि कंटेनर गायब झाले आहेत. शहरातील सर्व पोलीस ठाण्यात जप्त केलेली दारु नष्ट करण्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयाकडून डेटा गोळा केला जात होता. यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेली दारु गोडाऊनमध्ये ठेवली होती. यात प्लास्टीकच्या बाटल्या, कंटेनरमध्य भरलेली दारु होती. उंदराने प्लास्टीकच्या देशी दारुच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात कुरतडल्या आहेत. तसेच प्लास्टीकच्या कंटेनरमध्ये असलेले कच्या मद्याचेही उंदराने नुकसान केले आहे. उंदरांंने कुरतडल्याने देशी आणि कच्ची दारु असे सुमारे 20 हजार लिटर मद्य वाया गेले आहे. तसेच इंग्रजी दारुच्या बाटल्यांचे झाकण तोडून उंदीरांनी सुमारे 9 हजार लिटर दारू गायब केल्याचेही लंगड कारण पोलिसांननी सांगितले आहे.

दारु नष्ट करण्यासाठी माहिती गोळा केली जात असताना हा प्रकार समोर आला आहे. यात 824 प्रकरणांपैकी कोर्टाने 49 प्रकरणांमध्ये निकाल दिला आहे. अशा स्थितीत पोलीस या महिन्यात 982 लिटर देशी दारू, 1169 लिटर इंग्रजी दारू आणि 30 बिअर कॅन नष्ट करणार आहेत. दारु नष्ट करण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली जाणार आहे. या समितीत इतर दोन अधिकारी आणि मान्यवरांचा समावेश असणार आहे.