‘मी कोरोना लस घेणार नाही कारण…’, ‘या’ आरोग्यमंत्र्यांचा मोठा खुलासा

चंदीगड : वृत्तसंस्था –  आजपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. सध्या हि लस ६० वर्षांपुढच्या नागरिकांसाठी आणि ज्यांना इतर काही मोठे आजार आहेत अशा ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी देण्यात येत आहे. सर्वसामान्यांना लस उपलब्ध झाल्याबरोबरच पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घेतली. तसेच काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही लस घेतली. सगळे लस घेत असताना हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी मात्र लस घेण्यास नकार दिला आहे. अनिल वीज यांनी जेव्हा कोरोना लसीची ट्रायल सुरु होती तेव्हा त्यांनी ही लस घेतली होती. पण आता जेव्हा प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाली तेव्हा त्यांनी लस घेण्यास नकार दिला आणि त्यामागचे कारण सुद्धा त्यांनी सांगितले आहे. अरुण वीज यांनी ट्वीटच्या माध्यमातून हि माहिती दिली आहे.

काय म्हणाले अनिल वीज

आजपासून सर्वसामान्यांसाठी कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तेव्हा तुम्ही अगदी निसंकोचपणे लस घ्या. मला लस घेता येणार नाही कारण कारण कोरोना इन्फेक्शन झाल्यानंतर माझ्या शरीरातील अँटिबॉडी ३०० झाल्या आहेत आणि या भरपूर आहेत. मी ट्रायलमध्ये लस घेतल्यामुळे माझ्या शरीरातील अँटिबॉडी वाढल्या असाव्यात. त्यामुळे मला आता लस घेण्याची गरज नाही.

नोव्हेंबरमध्ये कोवॅक्सिन लसीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू असताना त्यामध्ये सहभागी होऊन अनिल वीज यांनी स्वतःला लस टोचून घेतली होती. यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. कोरोना लस घेतल्यामुळे त्यांना कोरोना झाला अशा प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर अनिल वीज यांनी कोरोना लशीचा एकच डोस घेतला, दुसरा डोस घेणं बाकी आहे, असं स्पष्टही दिलं होतं. लसीमुळे आपल्यावर कोणता परिणाम झाला नाही असे सांगत त्यांनी सगळ्यांना लस घेण्याचं आवाहन केले आहे.

सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरण सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी स्वतःला लस टोचून घेतली. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन लसीकरण करून घ्यावं असं आवाहनसुद्धा करण्यात आले आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीसुद्धा कोरोनाची लस टोचून घेतली आहे. “बिहारमध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस मोफत दिली जाईल.” तसेच बिहार राज्य सरकारतर्फे सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येसुद्धा कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे नितीश कुमार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.