दीड वर्ष एका पतीनं आपल्या पत्नीस ‘शौचालयात’ ठेवलं ‘कैद’, बाहेर येताच महिलेनं मागितली भाकर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : हरियाणामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका महिलेला एका वर्षापेक्षा जास्त काळ शौचालयात बंद करून ठेवण्यात आले होते. या महिलेच्या पतीवर एका वर्षापेक्षा जास्त काळ पत्नीला शौचालयात बंद करून ठेवल्याचा आरोप आहे. ही घटना हरियाणामधील पानिपतच्या सनौलीची आहे. अहवालानुसार आरोपी पती पत्नीला मारहाण करीत होता आणि तो महिलेस जेवणही देत नव्हता.

बाहेर येताच मागितली भाकर

ही घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा संरक्षण अधिकारी रजनी गुप्ता यांनी सनौली येथील पोलिसांची मदत घेतली. पोलिसांच्या मदतीने महिलेला कैदेतून मुक्त करण्यात आले. जेव्हा महिला शौचालयातून बाहेर आली तेव्हा तिने प्रथम भाकर खाण्यास मागितली. महिलेला बाहेर नेऊन जेव्हा अंघोळ घातली गेली, बांगड्या घातल्या गेल्या, तेव्हा महिलेने लिपस्टिक मागितली. इतके दिवस शौचालयात बंद असल्याने महिलेचे पाय सरळ होत नाहीत. दरम्यान महिलेची अशी अवस्था पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

सुमारे दीड वर्षांपासून शौचालयात बंद

असा आरोप आहे की रामरतीचा पती नरेशने महिलेस सुमारे दीड वर्ष शौचालयात बंधक बनवून ठेवले होते आणि तिला दिवसातून एकदाच जेवण करण्यासाठी बाहेर काढले जात होते. रजनी गुप्ता यांनी सांगितले की आम्हाला याबाबत माहिती मिळाली होती, त्यानंतर आम्ही नरेशच्या घरी पोहोचलो, त्यावेळी नरेश त्याच्या मित्रांसह पत्ते खेळत होता. जेव्हा आम्ही त्याला रामरतीबद्दल विचारले तेव्हा त्याने काहीच उत्तर दिले नाही. जेव्हा त्याची सक्तीने विचारपूस केली गेली, तेव्हा त्याने आम्हाला पहिल्या मजल्यावर नेले आणि शौचालयाचा दरवाजा उघडला, तेथे रामरतीला बंद करण्यात आले होते.

शरीराची हाडे स्पष्ट दिसत होती

महिला शौचालयामध्ये घाणेरड्या कपड्यांसह होती, तिच्या शरीराची हाडे स्पष्ट दिसत होती. बाहेर काढल्यावर महिलेने भाकर मागितली. दरम्यान महिलेस जेवायला देण्यात आले, त्यांनतर मुक्त होण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. नरेशने सांगितले की दहा वर्षांपूर्वी रामरतीचे वडील आणि भाऊ यांचे निधन झाले होते, तेव्हापासून रामरती मानसिकरित्या आजारी आहे. मला भीती वाटत होती की ती कुठे जाईल आणि एखाद्याला इजा पोहोचवेल म्हणून तिला शौचालयात बंद करून ठेवले होते. त्याच वेळी, जेव्हा त्याच्याकडे उपचाराची कागदपत्रे मागितली गेली तेव्हा त्याने 3 वर्षांपूर्वीची जुनी कागदपत्रे दाखविली. याप्रकरणी पोलिस ठाण्याचे प्रभारी सुरेंद्र सिंह यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.