सुषमा स्वराज यांच्या स्मरणार्थ ‘या’ तारखेला बदललं जाणार ‘अंबाला’ बस स्टॅन्डचं नाव

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणाच्या खट्टर सरकारने भाजपच्या दिवंगत नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या आठवणीत एक मोठे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंबाला नगर बस स्थानकाचे नाव बदलून माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.

हरियाणाच्या परिवहन मंत्र्यांनी केली घोषणा
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी या प्रस्तावाच्या अंमलबजावणीस मान्यता दिल्याचे हरियाणाचे परिवहन मंत्री मूलचंद शर्मा यांनी शुक्रवारी जाहीर केले. त्यांनी सांगितले की, अंबाला नगर विधानसभा मतदार संघातील भाजपचे आमदार असीम गोयल यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती केली की, बसस्थानकाचे नाव सुषमा स्वराज यांच्या नावावर करावे.

14 फेब्रुवारीला बदलणार बस स्टँडचे नाव
शर्मा यांनी सांगितले की, अंबाला येथील रहीवासी असलेल्या सुषमा स्वराज या देशाच्या राजकारणातील महत्वाचे व्यक्तिमत्व होते त्यामुळे त्याच्या जयंती निमित्त म्हणजेच 14 फेब्रुवारीला बस स्थानकाचे नाव बदलण्यात येईल.

इतर मुलींना देखील यातून मिळेल प्रेरणा
14 फेब्रुवारी रोजी सुषमा स्वराज यांचा जन्म दिवस आहे. त्यामुळे बस स्थानकाचे नामकरण देखील त्याच दिवशी करण्यात येणार आहे. शर्मा यांनी सांगितले की यामुळे राज्यातील इतर मुलींना देखील आपल्या कार्यामध्ये काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल.

फेसबुक पेज लाईक करा –