पतीची हत्या केली तरी सुद्धा ‘फॅमिली पेन्शन’वर पत्नीचाच हक्क : उच्च न्यायालयाचा निर्णय

अमृतसर : पंजाब आणि हरियाणा हायकोर्टने फॅमिली पेन्शनबाबत आश्चर्यकारक निर्णय सुनावला आहे. यानुसार जर पत्नीने आपल्या पतीचा खून देखील केला तरी सुद्धा तिला फॅमिली पेन्शनचा हक्क आहे. बलजीत कौर विरूद्ध हरियाणा राज्य केसमध्ये हायकोर्टाने 25 जानेवारीला निर्णय सुनावताना म्हटले, कुणीही सोन्याचे अंडे देणार्‍या कोंबडीला कापत नाही.

पत्नीला फॅमिली पेन्शनपासून वंचित ठेवता येऊ शकत नाही, जर तिने पतीची हत्या केली असेल तरी सुद्धा. फॅमिली पेन्शन, कल्याण योजना आहे, जी सरकारी कर्मचार्‍याच्या मृत्यूच्या स्थितीत त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देते. पत्नी जर गुन्हेगारी केसमध्ये दोषी असेल तरी सुद्धा फॅमिली पेन्शनचा तिला हक्क आहे.

बलजीत कौर यांच्या याचिकेवर कोर्टाने हा निर्णय सुनावला. अंबाला येथे राहणार्‍या बलजीत कौर यांनी कोर्टाला सांगितले की, हरियाणा सरकारचे कर्मचारी असलेला त्यांचा पती तरसेम सिंह यांचा 2008 मध्ये मृत्यू झाला होता आणि 2009 मध्ये त्याच मर्डर केसमध्ये त्यांचे नाव आले आणि 2011 मध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले. बलजीत कौर यांना 2011 पर्यंत फॅमिली पेन्शन मिळत होती, परंतु दोषी ठरवल्यानंतर हरियाणा सरकारने पेन्शन बंद केली.

पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने हरियाणा सरकारच्या तो निर्णय रद्द करत संबंधित विभागाला सर्व थकीत रक्कमेसह याचिकाकर्त्याला दोन महिन्याच्या आत पेन्शन सुरू करण्याचा आदेश दिला आहे.

पत्नीला सीसीएस (पेन्शन) नियम, 1972 च्या अंतर्गत पतीच्या मृत्यूनंतर फॅमिली पेन्शनसाठी पात्र मानले जाते. सरकारी कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने दुसरा विवाह केला तरी सुद्धा ती फॅमिली पेन्शन घेण्यास पात्र आहे.